
उरण, ता. २१ (बातमीदार) : गेल्या चार दिवसांपासून उरण तालुक्यातील चिरनेरसह परिसरात पसरलेल्या बर्ड फ्लूमुळे सर्वच जण भीतीच्या छायेत आहेत. हा रोग केवळ एकाच गावात आला असला तरी जिल्हा प्रशासनाने परिसरातील गावांतील कोंबड्या मारण्याचे आदेश दिल्यामुळे बाधा न झालेल्या कोंबड्याही ठार केल्या जात आहेत.
त्यामुळे देशी कोंबडी व त्यांची अंडी हेच मुख्य उत्पन्नाचे साधन असलेले शेतकरी हवालदिल झाले आहेत. रोजचे उत्पन्नच बंद झाल्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
उरण तालुक्यातील ग्रामीण भागात घरोघरी, फार्म, वाड्या-वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन होते. पूर्वी फक्त घरोघरी देशी कोंबड्या पाळल्या जात होत्या; मात्र आता या घरगुती व्यवसायाला मोठ्या व्यवसायाचे रूप देऊन कुक्कुटपालन वाढविण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.