हॅलो मी आयुक्त बोलतोय, बांगर यांची रुग्णांसोबत 'टॉक विथ कमिशनर' मोहीम

सुजित गायकवाड
Sunday, 20 September 2020

कोव्हीड केअर केंद्रातील रुग्णांना मिळत असणाऱ्या सुविधा आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी 'टॉक विथ कमिशनर' हा उपक्रम सुरू केला आहे. बांगर हे या उपक्रमांतर्गत यांनी थेट केंद्रातील रुग्णांच्या मोबाईलवर फोन करून अभिप्राय घेण्यास सुरूवात केली आहे.

नवी मुंबई : कोव्हीड केअर केंद्रात आराम करत असताना अचानक तुमचा फोन खणखणला, आणि समोरून आवाज आला, हॅलो मी आयुक्त बोलतोय, तर चकीत होऊन जाऊ नका. खरोखरच ते नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर असू शकतात. कोव्हीड केअर केंद्रातील रुग्णांना मिळत असणाऱ्या सुविधा आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी 'टॉक विथ कमिशनर' हा उपक्रम सुरू केला आहे. बांगर हे या उपक्रमांतर्गत यांनी थेट केंद्रातील रुग्णांच्या मोबाईलवर फोन करून अभिप्राय घेण्यास सुरूवात केली आहे. याआधी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 'वॉक विथ कमिशनर' या उपक्रमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. 

शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे एकट्या सिडको प्रदर्शन केंद्रांवर निर्भर न राहता महापालिकेने एपीएमसी मार्केटमधील निर्यात भवन आणि सानपाडा येथील राधेस्वामी आश्रम असे आणखीन दोन जम्बो कोव्हीड केअर केंद्रे सुरू केली आहे. या केंद्रांमध्ये रोजच्या रोज कोरोनाबाधित रुग्णांची भरती होती. कोरोना म्हटला की नुसते ऐकूणच व्यक्तीचे हातपाय गळून जातात.

कोरोनामुळे नुसते शारिरीक त्रासच नाही तर या आजाराच्या भीतीमुळे रुग्णावर मानसिक आघातही होतो. अशा रुग्णांना शारिरीक त्रासातून बाहेर पडण्यासाठी आणि मानसिक तणावातून सावरण्यासाठी महापालिकेकडून अनेक प्रयत्न सुरू आहेत. परंतू महापालिकेचे प्रयत्न खरोखरच रुग्णांपर्यंत पोहोचतात का. हे पडताळण्यासाठी अभिजीत बांगर यांनी टॉक विथ कमिशनर हे उपक्रम सुरू केले आहे. 

या उपक्रमांअंतर्गत बांगर यांच्या कार्यालयातून कोणत्याही कोव्हीड केअर केंद्रातील रुग्णाला मोबाईलवर फोन केला जातो. फोन करून बांगर त्याला त्याच्या प्रकृतीची विचारपूस करतात. त्याचबरोबर त्याला रोज डॉक्टर तपासायला येतात का?, ऑक्सिजन पातळी तपासतात का?, राहत असलेल्या केंद्रात स्वच्छता आहे का?, रोजच्या जेवणाचा दर्जा कसा असतो? असे प्रश्न विचारतात. याखेरीज तुमच्या कुटुंबातील इतर सदस्य सुद्धा दाखल आहेत का? असेल तर त्यांची माहिती तुम्हाला मिळतेय का असे रुग्णाला बरे वाटेल असे प्रश्न विचारले जातात. रोजच्या रोज पाच ते आठ रुग्णांच्या मोबाईलवर फोन केले जाते. त्यांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून येणाऱ्या अभिप्रायानुसार संबंधित कोव्हीड केअर केंद्रांना सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.

आत्तापर्यंत आलेल्या अभिप्रायनुसार रुग्णांकडून जेवणाच्या दर्जा, डॉक्टरांची तपासणी बाबत चांगले अभिप्राय मिळाले असल्याचे बांगर यांनी सांगितले. परंतू अद्यापही काही ठिकाणी स्वच्छता सुधारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. थेट आयुक्त यांनी मोबाईलवर फोन करून विचारपूस केल्यामुळे रुग्णाला बरे वाटते. बांगर यांच्या या उपक्रमात ज्याप्रमाणे त्यांना चांगले अभिप्राय मिळत आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या या उपक्रमाचे रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून कौतूक होत आहे.  

सकारात्मक उर्जा 

कोरोनामुळे माणसिक आणि शारिरीकरित्या खचलेल्या रुग्णांना धीर देण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रुग्णांसोबत टॉक विथ कमिशनर ही मोहीम सुरू केली आहे. रुग्णाला केलेला कॉल हा एकटा त्याच्यापर्यंत राहत नसून तो संपूर्ण वॉर्डमध्ये पसरतो. आपल्या नातेवाईकांपलीकडे आपली काळजी घेणारे सरकारी यंत्रणेतही कोणी तरी आहे, अशी भावना रुग्णाच्या मनात निर्माण होऊन सकारात्मक उर्जा तयार होत असल्याचे प्रशानाच्या निदर्शनास येत आहे.  

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले, इतर माध्यमांपेक्षा लोक खरे अभिप्राय देतात. ठरवून अभिप्राय देणाऱ्यांपेक्षा अचानक लोकांना फोन करून प्रश्न विचारला तर खरा अभिप्राय मिळतो. यामुळे प्रशासनातील लोकांमध्ये संदेश जाऊन अधिकारी सतर्क राहतात. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai Municipal Commissioner Abhijeet Bangar is calling to inquire about the condition of the corona patient