दिघा धरणाचा ताबा नवी मुंबई महापालिकेकडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

रेल्वेचे दिघा येथील १६५ वर्षांपूर्वी बांधलेले ब्रिटिशकालीन खांडी धरण नवी मुंबई पालिकेकडे हस्तांतरण होणार आहे. रेल्वे प्रशासनाने १५ जुलै २०१९ रोजी पालिकेला पत्र पाठवून हे धरण वर्ग करण्याची तयारी दर्शवली आहे.

नवी मुंबई ः रेल्वेचे दिघा येथील १६५ वर्षांपूर्वी बांधलेले ब्रिटिशकालीन खांडी धरण नवी मुंबई पालिकेकडे हस्तांतरण होणार आहे. रेल्वे प्रशासनाने १५ जुलै २०१९ रोजी पालिकेला पत्र पाठवून हे धरण वर्ग करण्याची तयारी दर्शवली आहे. माजी आमदार संदीप नाईक यांच्यासह मंगळवारी स्थायी समितीचे सभापती नवीन गवते, सभागृहनेते रवींद्र इथापे, पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ, नगरसेविका सलुजा सुतार आणि समितीच्या सदस्यांनी या धरणाचा पाहणी दौरा केला.

दिघ्यातील इलठणपाडा येथे ब्रिटिशांनी रेल्वे इंजिनांना पाणीपुरवठा करण्यासाठी खांडी धरणाची निर्मिती केली होती. कालांतराने या धरणामध्ये काही भागात गळती सुरू झाली. या धरणाच्या डागडुजीची गरज निर्माण झाली आहे. ९ महिन्यांपूर्वी माजी आमदार संदीप नाईक यांची  रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याबरोबर मुंबईत बैठक झाली होती. या बैठकीतही त्यांनी खांडी धरण पालिकेकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. याशिवाय खासदार राजन विचारे यांनी मागील आठवड्यात लोकसभेत दिघा धरण पालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर धरण हस्तांतरणाबाबत रेल्वे प्रशासनाचे पत्र पालिकेला प्राप्त झाले आहे. त्यानुसार पालिका या संबधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करेल. महापौर आणि आयुक्तांच्या माध्यमातून हा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती नाईक यांनी यावेळी दिली. 

धरण पालिकेकडे हस्तांतरित झाल्यावर दिघा, ऐरोली आणि परिसरातील नागरिकांसाठी पाणीपुरवठ्याचा नवीन स्रोत तयार होईल. धरणाची डागडुजी करून या ठिकाणी पर्यटनस्थळ विकसित करण्यात येईल. 
- संदीप नाईक, माजी आमदार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai Municipal Corporation is in control of Digha Dam of Railways