नवी मुंबई क्रीडा अकादमी सुरू करणार : आयुक्त

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 August 2019

गोर-गरीब मुलांना अगदी माफक दरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळांचे प्रशिक्षण देणारी राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा अकादमी महापालिकेतर्फे सुरू केली जाणार आहे. क्रीडा अकादमी सुरू करण्याचे महापालिकेचे नवे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या विचाराधीन आहे.

मुंबई : गोर-गरीब मुलांना अगदी माफक दरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळांचे प्रशिक्षण देणारी राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा अकादमी महापालिकेतर्फे सुरू केली जाणार आहे. क्रीडा अकादमी सुरू करण्याचे महापालिकेचे नवे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या विचाराधीन आहे. दोन दिवसांपूर्वीच विभागप्रमुखांच्या संयुक्त बैठकीत मिसाळ यांनी या अकादमीच्या संकल्पनेवर विस्तृत चर्चा केली. तसेच काही पाऊले उचलण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. 

रस्ते, गटारे, नाले, कचरा स्वच्छता, पाणीपुरवठा आदी रोजच्या पायाभूत सुविधांसोबत शहरातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या क्रीडा सुविधा मिळाव्यात, याकरिता मिसाळ प्रयत्नशील आहेत. विविध २९ गावांच्या विलिनीकरणातून नवी मुंबई शहर उदयास आले. नोकरी, व्यवसाय व व्यापार असा शहरातील नागरिकांचा मूळ उत्पन्नाचा स्त्रोत असल्यामुळे अनेकांना त्यांच्या मुलांना शहरातील नामांकित स्पोर्टस्‌ क्‍लबमध्ये दाखल करून प्रशिक्षण देता येते. परंतु, गोर-गरीब घरातील खेळाडूंना सरकारी खर्चात प्रशिक्षण मिळण्यासाठी महापालिकेतर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक नेमून उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी विभागप्रमुखांसोबत चर्चा करताना मिसाळ यांनी क्रीडा अकादमीच्या कल्पनेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना हालचाली सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

शहरात अनेक चांगले खेळाडू आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे खेळू शकत नाहीत. अशा खेळाडूंना मोठे होण्यासाठी व शहराचा नाव लौकीक वाढवण्यासाठी महापालिका क्रीडा अकादमी सुरू करण्याच्या विचारात आहे. सर्व लोकप्रतिनिधींसोबत चर्चेनंतर हा निर्णय घेतला जाईल.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त महापालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai sports academy to launch: Commissioner