नवी मुंबई: पामबीचवर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बाईक चालकांवर पोलिसांची कारवाई

विक्रम गायकवाड
Monday, 7 December 2020

नवी मुंबईत कर्णकर्कश आवाजात भरधाव वेगात मोटारसायकल चालविणाऱ्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली आहे.

मुंबई: नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने आरटीओ अधिकाऱ्यांच्या मदतीने रविवारी सकाळी पामबीच मार्गावर विशेष मोहीम राबवून सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाजात भरधाव वेगात मोटारसायकल चालविणाऱ्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली आहे. तसेच त्यांच्याकडून दंड देखील वसूल केला आहे. 

काही तरुण पामबीच मार्गावर मफलर सायलन्सर लावलेले मोटारसायकल कर्णकर्कश आवाजात भरधाव वेगात चालवत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी अशा दुचाकीवर कारवाई करण्यासाठी रविवारी सकाळी 5 ते 9 या दरम्यान पामबीच मार्गावर विशेष मोहीमेचे आयोजन केले होते. या मोहीमेदरम्यान, पामबीच मार्गावरील मोराज सिग्नल चौकात एकूण 39 दुचाकीची तपासणी करण्यात आली. या कारवाईत 250 सीसीवरील बाईकवर सायलन्सर लावणाऱ्या 2 दुचाकीवर, आवाजाची पातळी जास्त असलेल्या-2, पीयुसी नसलेले-2, नंबर फ्लेट नसलेले वाहन-1 अशा एकूण 7 वाहनांवर कारवाई करण्यात आली. या सर्व वाहन चालकांकडून अनुक्रमे 2 हजार ते 1 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या विशेष मोहीमेत सिवूड्स वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राम मांगले, उप प्रादेशिक अधिकारी किल्लेदार, क्षेत्रीय अधिकारी लंगोटे, आरटीओचे अधिकारी शितोळे आणि गावडे आदी सहभागी झाले होते. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक विभागाच्या माध्यमातून यापुढे देखील नियमित अशा प्रकारची विशेष मोहिम राबविण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

महत्त्वाची बातमी- ल्हासनगरः कोविड रुग्णालयाच्या ICU मध्ये स्फोट, 19 रुग्णांची सुखरुप सुटका

---------------------

(संपादन- पूजा विचारे)

Navi Mumbai traffic Police take action against bikers breaks rules on Palm Beach


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai traffic Police take action against bikers breaks rules on Palm Beach