नवनीत राणा 12 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर; 'लिलावतीत दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navneet Rana

नवनीत राणा 12 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर; 'लिलावतीत दाखल

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा जामीन मंजूर झाला असून अखेर १२ दिवसांनंतर नवनीत राणा तुरुंगातून बाहेर आल्या आहेत. दरम्यान, नवनीत राणा यांची प्रकृती ठीक नसल्यानं त्यांना थेट लिलावती रुग्णालयात नेण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी मीडियाशी बोलणं टाळलं आणि केवळ हात जोडून त्यांनी सर्वांचे आभार मानले. (Navneet Rana finally released from jail after 12 days Departure to Lilavati Hospital)

खासदार नवनीत राणा यांची भायखळा येथील महिला कारागृहात रवानगी करण्यात आली होती. तर त्यांचे पती आमदार रवी राणा यांची तळोजा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. दरम्यान, बोरिवली न्यायालयाने काल या दाम्पत्याला जामीन मंजूर केला त्यामुळं या दोघांची आज तुरुंगातून सुटका होणार होती. त्यानुसार कोर्टाचा जामिनाचा आदेश घेऊन पोलिसांची एक टीम भायखळा तर दुसरी टीम तळोजा तुरुंगाकडे रवाना झाली होती. त्यानंतर नवनीत राणा यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. पण अद्याप रवी राणा यांच्या सुटकेची प्रक्रिया सुरु आहे.

मुंबई महापालिकेचे अधिकारी राणांच्या घरी

दरम्यान, मुंबई महापालिकेचे अधिकारी आज कथीत अनधिकृत बांधकामाची पाहणी करण्यासाठी पुन्हा एकदा नवनीत राणा यांच्या घरी दाखल झाले होते. दुपारी १२.५० वाजता अधिकारी राणांच्या घरी पोहोचले आणि १२.५५ ला बाहेर पडले. घरी कोणीही नसल्यामुळं पालिका अधिकारी पुन्हा माघारी फिरले. "आज राणा कुटुंबियांना कसलीही नोटीस दिलेली नाही. आम्ही आज केवळ पाहणी करण्यासाठी आलो होतो. याप्रकरणी आता राणा कुटुंबीय आम्हाला पत्र देतील त्यानंतर आम्ही पुन्हा पाहणी करायला येऊ," असं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

हनुमान चालिसा आणि राजद्रोहाचा गुन्हा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान 'मातोश्री' समोर हनुमान चालिसा पठणासाठी अडून बसल्यानं मुंबईत शिवसैनिक आक्रमक झाले होते. वारंवार विनंती करुनही राणा दाम्पत्य ऐकत नसल्यानं कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानं पोलिसांनी राणा दाम्पत्याला ताब्यात घेतलं होतं. यावेळी पोलिसांना सहकार्य न केल्यानं तसेच वारंवार सरकारला आव्हान देत राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्यानं या दोघांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कोर्टानं त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळं नवनीत राणा यांना भायखळा येथील महिला कारागृहात तर रवी राणा यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

Web Title: Navneet Rana Finally Released From Jail After 12 Days Departure To Lilavati Hospital

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai Newsnavneet rana
go to top