रियाप्रमाणे दीपिका, सारा यांच्याही मोबाईलचे डेटा मिळवणार, इमेजिंग तंत्राच्या मदतीने डेटा करणार क्लोन

अनिश पाटील
Monday, 28 September 2020

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणारे केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथक रियाप्रमाणे इतर अभिनेत्रींच्या मोबाईलमधील डिलीट डेटा मिळवणार आहे. त्यासाठी इमेजिंग तंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

मुंबई:  गेले काही दिवस बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण चांगलंच वळण घेताना दिसत आहे.  अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह या चार अभिनेत्रींचे मोबाइल फोन जप्त केलेत.  बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणारे केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथक रियाप्रमाणे इतर अभिनेत्रींच्या मोबाईलमधील डिलीट डेटा मिळवणार आहे. त्यासाठी इमेजिंग तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर,  रकूल प्रीतसिंह, सिमोन खंबाटा, करिष्मा प्रकाश आणि जया साहा यांचे मोबाईल फोन एनसीबीने जप्त केलेत.

जप्त केलेल्या मोबाईल फोनमधील डेटाच्या आधारे ड्रग्ज प्रकरणात गुंतलेल्या बड्या नावांचाही खुलासा होण्याची शक्यता आहे. एवढंच नव्हे तर डिलीट केलेला मोबाईलमधील डेटा देखील परत मिळवण्याचा प्रयत्न असल्याची माहिती एनसीबी सूत्रांनी दिलीय. त्यासाठी सायबर न्यायवैधक विभागाची मदत घेण्यात येणार आहे. एनसीबी या सर्व मोबाईलमधील डेटा क्लोनींग करून डिलीट संदेश मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्या सहाय्याने यापूर्वीच चॅट आणि इतर व्यक्तींसोबत झालेल्या चॅटची तपासणी करण्यात येईल.

त्यासाठी इमेजिंग तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. रियाच्या मोबाईलमधील डेटाही अशाच पद्धतीनं मिळवण्यात आला होता. सामान्यतः कॉपी पेस्ट केल्यामुळे मोबाईलमधील उपलब्ध फाईल्स मिळवता येतात. पण इमेजिंगच्या मदतीने मोबाईल डेटाचे क्लोनिंग केल्यास जून्या डिलीट केलेल्या फाईल्सही मिळवता येतात. त्यामुळे सध्या या अभिनेत्री करत असलेले दावे यांची पडताळणी या डेटाच्या माध्यामातून करणे शक्य होणार आहे. 

तसेच त्यांच्यातील जुने संदेशही मिळवता येतील असे सूत्रांनी सांगितले. त्यासाठी असलेल्या कायदेशीर प्रक्रिया केल्या, तर न्यायालयातही असे पुरावे ग्राह्य धरले जातात. यापूर्वी नायरमधील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातही अशाच पद्धतीचा वापर करून मोबाईलमधील डिलीट करण्यात आलेले पुरावे मिळवण्यात आले होते. दहशतवादी, घातपाती कृत्यांमध्ये अशा तंत्राचा सर्रास वापर केला जातो.

--------------------------

(संपादनः पूजा विचारे)

NCB get clone data from Deepika Sara mobile help imaging technique


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCB get clone data from Deepika Sara mobile help imaging technique