आज दिवसभर मीही अन्नत्याग करणार: शरद पवार 

पूजा विचारे
Tuesday, 22 September 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या कृषी धोरणावर, तसंच राज्यसभेच्या उपसभापती यावर प्रश्न उपस्थित केले.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या कृषी धोरणावर, तसंच राज्यसभेच्या उपसभापती यावर प्रश्न उपस्थित केले. यावेळी शरद पवारांनी जाहीर केलं की,  कृषी विषयक विधेयकांवरुन राज्यसभेत गोंधळ घातल्याने निलंबित झालेले आठ खासदार अन्नत्याग केला आहे. आज दिवसभर मीही अन्नत्याग करुन त्यांच्या अभियानात सहभागी होणार आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे म्हटलं आहे. राज्यसभेत कृषी विधेयकं मंजूर करताना झालेल्या गोंधळावर त्यांनी आजच्या परिषदेत प्रतिक्रिया दिली. 

ही विधेयकं तातडीने मंजूर करावी असा सत्ताधारी पक्षाचा आग्रह होता असं दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विरोधकांना काही आक्षेप होते, पण काम रेटून नेण्याचा‌ प्रयत्न केला अशी टीकाही शरद पवारांनी यावेळी केली. राज्यसभा सदस्यांना निलंबित करुन त्यांचे अधिकार काढले असं म्हणत सगळ्या सदस्यांनी आत्मक्लेष करण्यासाठी काल संध्याकाळपासून उपोषण केलं, असंही ते म्हणाले. 

आपल्या मनातील भावना त्यांनी सभागृहाबाहेर व्यक्त केल्या. आश्चर्याची बाब म्हणजे उपासभापतींनी नियमांना महत्त्व न देता, सदस्यांचे अधिकार नाकारले आणि उपोषण करणाऱ्या सदस्यांना चहा देण्याचा प्रयत्न केला. सदस्यांनी चहाला हात लावला नाही हे बरंच झालं, असंही ते म्हणालेत. 

केंद्र सरकारच्या कृषी धोरणात विरोधाभास असल्याचंही त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. एकीकडे परवानगी दिली जाते, मात्र त्याचवेळी कांद्यावर निर्यात बंदी घातली जाते. जेएनपीटीमध्ये शेतमाल पडून असल्याचं सांगितल्यानंतर परवानगी दिली जाते. पण इतर मालाचं काय? हा विरोधाभास असल्याचं पवार यांनी सांगितलं.

तसंच मराठा आरक्षण प्रकरणी अपील लवकर करण्याची गरज असल्याने मला दिल्लीत जाता आलं नसल्याचंही यावेळी शरद पवारांनी सांगितलं.  मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.  मराठा आरक्षण स्थगितीविरोधात सरकारने सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज दाखल केला आहे. यासंदर्भात गेल्या दोन दिवसांपासून बैठका सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

NCP chief sharad pawar Press conference On rajya sabha and farm bills


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief sharad pawar Press conference On rajya sabha and farm bills