"आरोप गंभीर, पक्ष म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागेल" पवारांची पहिली प्रतिक्रिया; मुंडे राजीनामा देणार?

सुमित बागुल
Thursday, 14 January 2021

धनंजय मुंडे मला भेटले, त्यांनी सर्व आरोप आणि या प्रकरणाची सर्व स्थिती मला सांगितली.

मुंबई : धनंजय मुंडे प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचे स्वरूप गंभीर आहे, असं शरद पवार यांनी म्हटलंय. पक्षातील सर्व नेत्यांशी चर्चा करणार असून धनंजय मुंडे यांनी दिलेली माहिती सर्व नेत्यांना देणार असंही शरद पवार यांनी म्हटलंय. पक्ष म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागेल असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी म्हटलंय. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया आता समोर येताना पाहायला मिळतेय.  

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाचे स्वरूप गंभीर...

धनंजय मुंडे मला भेटले, त्यांनी सर्व आरोप आणि या प्रकरणाची सर्व स्थिती मला सांगितली. त्यांच्या माहितीनुसार त्यांचे काहींशी घनिष्ठ संबंध होते. त्याप्रकरणी काही तक्रारी झाल्या, पोलिसात त्यांच्या बद्धलची तक्रार आली. व्यक्तिगत हल्ले होतील असा अंदाज त्यांना असावा म्हणून त्यांनी याआधीच हायकोर्टात आपली भूमिका मांडली आहे. कोर्टाचा एक आदेश त्यांनी प्राप्त करून घेतला होता . तो हायकोर्टाचा आदेश असल्याने त्यावर भाष्य करण्याचं काही काम नाही, असं शरद पवार म्हणालेत.  

यापुढे शरद पवार म्हणालेत की, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाचे स्वरूप गंभीर आहे. त्यामुळे या संबंधीचा काहीतरी निर्णय पक्ष म्हणून आम्हाला घ्यावा लागेल. यासाठी मी पक्षाचे प्रमुख सहकाऱ्यांशी बोलणार आहे. धनंजय मुंडे यांनी मला दिलेली सर्व माहिती पक्षातील प्रमुख सहकार्यांना देणार आहे. सर्वांना याबाबतची माहिती देऊन सर्वांची मते लक्षात घेऊन पुढील पावले टाकणे हे आम्ही लवकरात लवकर करण्याच्या विचारात आहोत. मला असं वाटत नाही की याला फारसा विलंब करावा. कोर्टाचे निर्णय होतील, पोलिसांची चौकशी होईल त्यावर मला बोलायचं नाही. मात्र पक्ष म्हणून आणि पक्ष प्रमुख म्हणून जो काही निर्णय, जी काही काळजी घ्यावी लागेल तो आम्ही घेऊ.

दरम्यान, शरद पवार यांच्या पहिल्या प्रतिक्रियेनंतर आता धनंजय मुंडे यांच्याबाबत काय निर्णय होतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

NCP chief sharad pawars first reaction on dhanjay munde case says we will soon take decision

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief sharad pawars first reaction on dhanjay munde case says we will soon take decision