नाथाभाऊंना लिमलेटची गोळी की कॅडबरी; चंद्रकांत पाटील यांचा खोचक सवाल

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 23 October 2020

एकनाथ खडसेंच्या समाधानासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आता त्यांना लिमलेटची गोळी देणार की कॅडबरी? असा खोचक सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

मुंबई : एकनाथ खडसेंच्या समाधानासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आता त्यांना लिमलेटची गोळी देणार की कॅडबरी? असा खोचक सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच भाजपमध्ये त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर त्यावर काहीतरी मार्ग काढता आला असता. त्यासाठी पक्ष सोडण्याची गरज नव्हती, अशी टिप्पणी करीत चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

अधिक वाचा : नाथाभाऊंची ताकद महाराष्ट्राला दाखवू, शरद पवारांचं सूचक विधान

खडसे यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम दुपारी दोन वाजता ठरला होता. मग तो दुपारी चारपर्यंत का लांबला? हे जयंत पाटील यांनी सांगावे. नाथाभाऊंना काय द्यायचे, हे ठरले नाही. तुमचे समाधान होईल? असे देऊ एवढ्यावर शेवटी नाथाभाऊ बळेबळे नरीमन पॉईंटच्या घरातून बाहेर पडले. असे खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले. तुमचे समाधान होईल यामध्ये लिमलेटची गोळीनेही समाधान होते आणि कॅडबरीनेही समाधान होते. त्यामुळे आता त्यांना ते लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात? आणि त्यावर मनापासून समाधानी होतात. हे पहावे लागेल. नाथाभाऊ यांच्याकडे आता काही पर्यायच नाही म्हणून जे देतील त्याच्यावर समाधानी आहेत, असेही ते म्हणाले. 

अधिक वाचा : 'भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्याने म्हटले की, पक्ष बदलता आला तर बदलून टाका'' - एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

हे बरोबर नाही! 
एकनाथ खडसे हे भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत आरोप करत आहेत. एकट्या देवेंद्र फडणवीस यांना नाथाभाऊंनी लक्ष्य करणे बरोबर नाही. भाजपचे निर्णय सामूहिक असतात. त्यामुळे त्यांनी फडणवीसांवर टीका करणे योग्य वाटत नाही, असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. 
----------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp gives Nathabhau to limlet pill or Cadbury; Chandrakant Patil's question