Mumbai News : राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांचा पदाचा राजीनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP Kalyan district president Jagannath Shinde resigns from post politics mumbai

Mumbai News : राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांचा पदाचा राजीनामा

डोंबिवली - राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्याकडे दिला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी पक्षाने उभारी घेतली होती. स्थानिक पातळीवर देखील संघटना मजबुतीकरण पक्षाकडून केले जात असताना 2020 मध्ये रमेश हनुमंते यांची उचलबांगडी करत पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची धुरा शिंदे यांच्या खांद्यावर दिली होती.

शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाला संजीवनी मिळत असतानाच त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. प्रकृती ठिक नसल्यामुळे शिंदे यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर या पक्षाने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पकड मजबूतीकरण सुरु केले आहे. महाविकास आघाडी सरकार विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत असून ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची पकड देखील काही भागांत मजबुत आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत राष्ट्रवादी पक्षाने 2005 साली सत्ता उपभोगली आहे. मात्र त्यानंतर पक्षातील अंतर्गत कुरघोडी, गटातटाचे राजकारण यामुळे राष्ट्रवादी बॅकफूटवर गेली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पक्ष संघटन मजबुती करण्याचे काम पक्षाने हाती घेतले होते. त्यानुसार पदाधिकाऱ्यांची नवनियुक्ती पक्षाकडून करण्यात आली.

2020 मध्ये कल्याण जिल्हाध्यक्ष पदावरून रमेश हनुमंते यांची उचलबांगडी करत पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी संयमी व सक्षम व्यक्तीमत्व असलेले माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या खांद्यावर दिली होती. त्यानुसार शिंदे यांनी रणनिती आखत कामास सुरुवात केली होती.

पक्षातील नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात शिंदे यांना यश आले होते. 2021 मध्ये पालिका निवडणूकांचे वारे वहात असताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड डोंबिवलीत आले होते. राष्ट्रवादीच्या मेळाव्यास जमलेली गर्दी पाहून आव्हाड यांनी शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले होते.

जगन्नाथ शिंदे हे गेल्या 40 वर्षापासून वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत आहे. ऑल इंडिया केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. टिटवाळ्यात त्यांच्याकडून एक सैनिकी शाळा चालविली जात आहे. राष्ट्रवादीचे ते जुने कार्यकर्ते असून पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्तीय आहेत.

यामुळे त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आले होते. आमदारकीची मुदत संपल्यानंतर कल्याण मध्ये राष्ट्रवादीला उभारी देण्यासाठी जिल्हाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे देण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी आपल्याकडे समन्वयक पदाची जबाबदारी पक्षाकडे मागितली होती व उमेश बोरगांवकर यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पद देण्याची मागणी केली होती.

परंतू पक्षाने जिल्हाध्यक्ष पद शिंदे यांनाच दिले. पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर त्यांनी रस्ते विकासकामे, बीएसयुपी घरे, उल्हास नदी प्रदुषण यांसारख्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

गेले दोन अडीच वर्षे शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष पद सांभाळले आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही नाराजी असल्याचे पहायला मिळत आहे. शिंदे यांच्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला होता.

आता कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन, त्यांच्या समस्या समजून घेण्याचे काम शिंदे यांनी केले होते. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शिंदेंच्या राजीनाम्यामुळे आता पक्षाला उभारी कशी मिळेल याविषयीची चिंता आता कार्यकर्त्यांना भेडसावत आहे.

प्रकृती ठिक नसल्याने जिल्हाध्यक्ष पदाचे काम पाहणे शक्य होत नसल्याचे शिंदे यांनी म्हणत वरिष्ठांकडे आपल्या पदाचा राजीनामा दिली आहे. पक्षाने अद्याप त्यांच्या पदाचा राजीनामा स्विकारला नसला तरी या पदासाठी इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात सुरु झाली आहे.

जगन्नाथ शिंदे यांनी राजीनामा का दिला याविषयी पक्षातील पदाधिकाऱ्यांना विचारले असता आपल्याला याविषयी काही माहिती नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

- कल्याण डोंबिवली पालिका निवडणूकांचा आढावा घेता कल्याण डोंबिवली पालिका निवडणूकीत पक्षाचे 10 नगरसेवक निवडून आले होते. 2005 मध्ये 25 तर 2010 मध्ये 14 नगरसेवक निवडून आले होते.

- 2005 साली अपक्षांच्या मदतीने राष्ट्रवादीने पालिकेत सत्ता उपभोगली. त्यावेळी जगन्नाथ शिंदे यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात राष्ट्रवादीचा महापौर पहिल्यांदा पालिकेत विराजमान झाला होता.

टॅग्स :Mumbai NewsNCPresignation