'करून दाखवलं'; नवाब मलिक यांच्या घरात गुडघाभर पाणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

नवाब मलिक यांच्या घराच्या हॉलमध्ये, किचनमध्ये पाणी साठून उपकरणांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे गुडघाभर साठलेल्या पाण्यात उभे राहून आणि घराची अवस्था नेमकी कशी आणि काय झाली ते दाखवणारे छायाचित्र ट्विट केले आहेत.

मुंबईः मुंबई शहर व उपनगराला सोमवारी (ता. 1) रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरातही गुडघाभर पाणी शिरले आहे. मलिक यांनी छायाचित्रे ट्विट करत 'करून दाखवलं' असे लिहीले आहे.

नवाब मलिक यांच्या घराच्या हॉलमध्ये, किचनमध्ये पाणी साठून उपकरणांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे गुडघाभर साठलेल्या पाण्यात उभे राहून आणि घराची अवस्था नेमकी कशी आणि काय झाली ते दाखवणारे छायाचित्र ट्विट केले आहेत. छायाचित्रे ट्विट करताना मुंबई महापालिकेचे आभार मानले आहेत. 'करून दाखवले' या असे म्हणत शिवसेनेलाही टोला लगावला आहे. 'करून दाखवलं' हे शिवसेनेचे ब्रीद वाक्य आहे. शिवसेना एखादे काम केल्यानंतर 'करून दाखवलं' या नावाने होर्डिंग लावत असते. याच वाक्याचा संदर्भ घेत नवाब मलिक यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

दरम्यान, मुंबईत पावसाने दाणादाण उडवली असून, शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. दादर, सायन, लालबाग, मुलुंडमधील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. तर, वाकोला पोलिस ठाणे पाण्यात शिरले आहे. उपनगरी रेल्वे सेवेचा 30 जून आणि 1 जुलैला झालेल्या मुसळधार पावसाने पुरता बोजवारा उडाला आहे. सोमवारी सकाळपासूनचा त्रास कमी होता की काय म्हणून रात्री साडेअकरानंतर मध्य आणि हार्बर रेल्वेच्या ठिकठिकाणच्या रुळावर पाणी साचल्याने सर्व लोकल जाग्यावरच अनिश्चत काळासाठी अडकून पडल्या. त्यामुळे रात्रीची ड्युटी करून घरी परतणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत.

अतिवृष्टीमुळे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई व कोकण परिसरातील सर्व पालिका, सरकारी व खासगी शाळांना आज सुटी जाहीर केली आहे. सध्या मुंबईत सगळे व्यवहार ठप्प झाले असून, शाळे पाठोपाठ सरकारी कर्मचाऱ्यांनाही रजा घोषित करण्यात आली आहे. मुंबईत आजही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सरकारने मुंबईतील सर्व कर्मचाऱ्यांना सुटी जाहीर केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader nawab malik tweets his house water logging photos on twitter and ask questions to shivsena