esakal | शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल नवाब मलिक यांनी दिली महत्त्वाची माहिती

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar
शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल नवाब मलिक यांनी दिली महत्त्वाची माहिती
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी महत्त्वाची माहिती दिली. "शरद पवार यांच्या पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दैनंदिन वैद्यकीय तपासणीसाठी ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तपासणी दरम्यान पवार यांच्या तोंडात लहान अल्सर सापडल्यानंतर तो अल्सर काढण्यात आला. आता शरद पवार यांची प्रकृती उत्तम आहे. आणखी काही दिवसांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल", अशी माहिती मलिक यांनी ट्वीटरवर एक व्हिडीओ पोस्ट करून दिली.

हेही वाचा: शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे? लाभ घेण्यासाठी नेमका कुठे व कसा करायचा अर्ज?

"शरद पवार हे सध्या ब्रीच कँडी रूग्णालयातच आहेत. रूग्णालयातून ते कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. ज्या ठिकाणी पक्षाच्या नेत्यांना पवार यांच्या मार्गदर्शनाची गरज भासेल, त्या नेत्यांना रूग्णालयातूनच ते मार्गदर्शन करतील आणि आदेश देतील", असंदेखील नवाब मलिक यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर थोड्या दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया झाली. या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र आज दैनंदिन वैद्यकीय तपासणी म्हणजेच रूटीने चेक-अपसाठी ते रूग्णालयात दाखल झाले, तेव्हा त्यांच्या तोंडात अल्सर असल्याचं निदर्शनास आलं. तो अल्सर काढून टाकण्यात आला असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे, असं राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आलं.