
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात कोरोनामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. राज्यातील अनेक नागरिक आणि संघटनांनी आपल्या समस्या आणि तक्रारींचे गऱ्हाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कडे मांडले आहे
मुंबई - महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात कोरोनामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. राज्यातील अनेक नागरिक आणि संघटनांनी आपल्या समस्या आणि तक्रारींचे गऱ्हाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कडे मांडले आहे. त्यामुळे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महाविकास आघाडीला डिवचले आहे.
हेही वाचा - सिद्धिविनायकला क्यूआर कोड तर महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाही
कोरोनामुळे अनेक व्यवहार सुरळीत होण्यास अडचणी येत होत्या. अनेकांचे रोजगाराचे प्रश्न निर्माण झाले होते. तर काहींच्या वेगळ्याच समस्या होत्या. असे अनेक नागरिक आणि संघटनांनी राज ठाकरेंकडे आपल्या अडचणी सोडवण्यासाठी धाव घेतली. गणेशोत्सवात कोकणवासीयांसाठी विशेष ट्रेन सोडण्याबाबत, वाढीव वीजबिलांबाबत, कोळी बांधवांचे प्रश्न, प्रवासी संघटना, मुंबईतील डबेवाले, विद्यार्थी - पालक समन्वय समितेचे प्रश्न, बॅंड पथक संघटना इत्यादी अनेकांनी आपल्या समस्या आणि तक्रारींचा पाढा राज ठाकरे यांच्या समोर मांडला. राज यांनी देखील त्या समस्या सोडवण्यासाठी योग्य तो पाठपुरावा केलेला दिसला. त्यामुळे मनसेचे राज्यातील जनतेकडून कौतुक होत आहे.
हेही वाचा - 'महाराष्ट्राच्या संस्कृतीला बीडच्या घटनेने काळिमा, महिला सुरक्षेसाठी कृती आरखडा हवा' - प्रवीण दरेकर
राज यांचे निवासस्थान, कृष्णकुंज येथे कोरोना काळात अनेक संघटना आणि नागरिकांनी भेट दिली. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साह पाहायला मिळत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीला डिवचले आहे. त्यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, ''समस्या अनेक उपाय एक ,महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता "श्री राजसाहेब ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई 28''
देशपांडे यांच्या ट्विटवर महाविकास आघाडी समर्थक नेटकरी व्यक्त होत आहेत. त्यामुळे देशपांडे यांच्या ट्विटला महाविकास आघाडीचे नेते काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.