New Year 2021: कोरोनाच्या संकटातही मुंबई पोलिसांचा धैर्यांचा लढा

New Year 2021: कोरोनाच्या संकटातही मुंबई पोलिसांचा धैर्यांचा लढा
Updated on

मुंबईः 2020 या वर्षात कोरोनाने थैमान घातला असताना त्याची सर्वाधिक झळ मुंबई पोलिसांना पोहोचली. पण त्या परिस्थितही पोलिसांनी धैर्यांना लढा देऊन त्यावर मात केली. मुंबईतील गुन्ह्यांचा आढावा घेतला. तर इतिहासात प्रथमच केंद्रीय यंत्रणांनी हे वर्ष गाजवले. सुशांतसिंग मृत्यूप्रकरण असो वा बॉलिवूडमधील ड्रग्स वितरणाचे गुन्हे वर्षभर हे प्रकरण चर्चेत राहिले. मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलेला टीआरपी प्रकरणाचीही देशभर चर्चा झाली. त्या अनुषंगाने वर्षभरातील गुन्ह्यांचा घेतलेला आढावा.

पोलिसांचा कोरोनाशी लढा

कोरोनाविरोधातील लढ्याचा प्रमुख स्तंभ असलेल्या पोलिसांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर जागता पहारा दिला. त्यामुळे राज्यभरातील 28 हजारांहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली. तर 300 हून अधिक पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पण अशाही बिकट प्रसंगी परप्रातीय मजुरांना त्यांच्या गावी पाठवणे असो, कंन्टेन्मेट झोनला सुरक्षा पुरवणे असो, रस्त्यावर विनाकारण उतरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे काम असो वा निराधार व्यक्तींना जेवण पुरण्याचे काम असो, रस्त्यावरील समाज कंटकांसह समाज माध्यमांवर विष पसरवणाऱ्यांवर कारवाई करणे अशी विविध कार्य हे योद्धे समर्थपणे पार पाडत पाडली.  

देशातील सर्वात पहिला कंन्टेन्मेंट झोन करण्यात आलेल्या वरळी कोळीवाड्यातील पॅटर्नचे देशभरात कौतुक केले गेले. त्यानंतर धारावीतील कोरोना संकटही क्षमले आहे. त्यात पोलिसांचाही मोठा वाटा आहे. देशात लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने, अनेक कुटुंबातील मोलकरणीने कामावर जाणे बंद केले. यामुळे घरात एकटे असलेले ज्येष्ठ नागरिक तसेच अपंग व्यक्तींच्या अडचणीत वाढ झाली होती. अशा नागरिकांही पोलिसांनी आसरा दिला.  मुंबई पोलिसांनी तर समाज माध्यमांवरील 600 आक्षेपार्ह पोलिस हटवून सामाजिक सलोखा राखला आहे. पोलिसांनी मुंबईत संचारबंदीच उल्लंघन केल्याप्रकरणी  27 हजार 448 गुन्हे दाखल केले.
 
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू

14 जून 2020 ला दुपारच्या सुमारास बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू झाला. कोरोनासारख्या भयंकर साथीलाही मागे टाकून सुशांत सिंगचा विषय अचानक समाज माध्यमांमध्ये सर्वाधिक ट्रेंडिग ठरू लागला. काही दिवसांनी सुशांतचा मृत्यू हा आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा करणारी माहिती समाज माध्यमाद्वारे व्हायरल केली जाऊ लागली. त्यासाठी हँश टॅग मोहिमा राबवण्यात आल्या. विशेष म्हणजे परदेशी भाषांमध्येही करण्यात आलेल्या पोस्टमध्ये सुशांत संबंधित हॅशटॅग पाहयला मिळाले. त्यातून दिशा सालियानच्या मृत्यूपूर्वी एक पार्टी झाली होती. त्या पार्टीत एक मोठा अभिनेता, रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती तसेच महाराष्ट्र सरकारमधील एक युवा मंत्रीही सहभागी झाल्याची चर्चा रंगवण्यात आली. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त करून बिहार पोलिसांत रिया चक्रवर्ती विरोधात तक्रार केली. त्यातून पुढे मुंबई पोलिस विरुद्ध बिहार पोलिस असा नवा वाद उद्याला आला. त्यावेळी बिहारचे पोलिस अधिकारी विनय तिवारी यांना क्वारंटाईन करण्यात आल्याच्या घटनेने आणखी खतपाणी घातले. अगदी मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना ताब्यात घेतल्याच्या तथ्यहीन बातम्याही प्रसारीत झाल्या. त्यातून बिहार सरकार विरुद्ध महाराष्ट्र सरकार असे चित्रही उभे करण्यात आले.  पुढे हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. विशेष म्हणजे रियानेही हा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे केली होती. सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे वर्ग केल्यानंतर सीबीआयचे पथक मुंबई दाखल झाले. त्यांनी नव्याने तपास करत अनेकांचे जबाब नोंदवले. मुंबई पोलिसांसह सीबीआयच्या  तपासातही सुशांतची हत्या नसून आत्महत्याच असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे एम्सच्या अहवालातही ही आत्महत्याच असल्याचे स्पष्ट झाले.

बॉलिवूड ड्रग्स वितरण

सुशांत सिंग प्रकरणात सीबीआय, ईडीच्या तपासात काहीच निष्पन्न होत नसल्याचे चित्र निर्माण झाल्यानतंर केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाची(एनसीबी) या प्रकरणात एन्ट्री झाली. सुशांत सिंगच्या मृत्यूपासून सुरू झालेले प्रकरण आता बॉलिवूडमधील हिप्रोक्रसी आणि ड्रग्स सेवनावर पोहोचले. अंमली पदार्थ खरेदी आणि सेवनाचे आरोप प्रत्यारोप झाले. त्यातून पुढे याप्रकरणी रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, सुशांतचा नोकर दिपेश सावंत, मित्र सॅम्युएल मिरांडा यांच्यासह काही ड्रग्स पेडलर्सना अटक करण्यात आली. 

याप्रकरणी पुढे दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपुर, रकुलप्रीत यांच्यासह अभिनेता अर्जुन रामपालचीही चौकशी करण्यात आली. अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिएला डेमेट्रियड्स हिचा भाऊ अॅजिसिलाऊस डेमेट्रीअॅडेट्सला एनसीबीने अटक केली होती. लोणावळा येथे डेमेट्रीअॅडेट्स राहत असलेल्या घरावर छापा टाकला. तेथे तो त्याच्या प्रेयसीसोबत राहत होता. त्याच्याकडून 0.8 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर डेमेट्रीअॅडेट्सला खार येथील घराचीही झडती घेण्यात आली. तेथे अलफ्रॅझोलन गोळ्यांची एक स्ट्रीप सापडली होती. याशिवाय अर्जुन रामपालचा मित्र पॉल बार्टेलला एनसीबीने अटक केली होती. पॉल हा ऑस्ट्रेलियन असून तो एका मोठ्या बांधकाम कंपनीत काम करतो. तो वास्तू विशारद आहे.

सीबीआयला तपासबंदी

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्षांने बुधवारी नवे वळण घेतले. राज्यातील प्रकरणांच्या तपासास केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) असलेली सरसकट अनुमती मागे घेत राज्य सरकारने सीबीआयला तपासबंदी केली. राज्याच्या गृहविभागाने याबाबत ऑक्टोबर महिन्यात आदेश काढला होता. मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दूरचित्रवाहिन्यांचा ‘टीआरपी’गैरव्यवहार उघडकीस आणला. त्यानंतर ‘टीआरपी’ प्रकरणात उत्तर प्रदेशमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला असून, ते प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले आहे. त्यामुळे ‘टीआरपी’गैरव्यवहार प्रकरणातही सीबीआय तपासाचा मार्ग मोकळा करण्यात येत असल्याची कुणकुण लागताच महाविकास आघाडी सरकारने तातडीने हालचाल करीत सीबीआयला राज्यात तपासबंदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यापुढे राज्यात कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयला राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. याआधी राजस्थान, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या बिगर-भाजपशासित राज्यांनी सीबीआय प्रवेशावर निर्बंध घातले आहेत.

टीआरपी प्रकरण

बीएआरसी ही संस्था भारतीय माहिती व प्रसारण मंत्रालय (एमआयबी) तसेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ( ट्राय) यांच्या अधिपत्याखाली काम करते.  या संस्थेने संपूर्ण भारतातील विविध ठिकाणी जवळपास 3 हजार बोरोमिटर्स बसवले असून त्याद्वारे प्रेक्षकांनी पाहिलेल्या पाहिलेल्या कार्यक्रमांवर निगराणी ठेवली जाते. त्याद्वारे विविध चॅनेल्सना रेटींग दिले जाते. बीएआरसीने दिलेल्या रेटिंग्ज नुसार जाहिरातदार जाहिरात प्रसारित करणाऱ्यांना पैसे देतात. टीआरपीमध्ये फेरफार करून फसवणूक केल्यामुळे त्याचा विपरित परिणाम लक्ष केलेल्या चॅनेल्सना होतो आणि अशा प्रकारे फेरफार करून टीआरपी वाढवल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते.

याप्रकरणी तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम 409, 420, 465, 468, 406, 120(ब), 201, 204, 212 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल होता. आतापर्यंत याप्रकरणी15 आरोपींना अटक करण्यात आली आहे.  गुन्हे शाखेने नुकतीच 12 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नुकततीच बीएसआरसीचे माजी सीईओ दासगुप्ता यांना अटक केली होती. ही  याप्रकरणी 15 आरोपींना अटक होती. आरोपी पार्थ दासगुप्ता हे बीएआरसी या कंपनीत मुख्य कार्यकारी म्हणून कार्यरत असताना त्याने रिपब्लिक भारत हिंदी न्यूज चॅनेल आणि रिपब्लिक टीव्ही इंग्रजी न्यूज या चॅनल्सचे टीआरपीमध्ये अर्णब गोस्वामी तसेच अन्य संबंधित आरोपींशी अन्यायाचे संगनमत करून गैरकायदेशीर मार्गाने फेरफार करून त्यांची टीआरपी वाढविली. त्याबदल्यात नमूद टीव्ही चॅनल्सचे अर्णब गोस्वामी यांनी आरोपी पार्थ दासगुप्ता यास वेळोवेळी लाखो रूपये दिले असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या पैशातून पार्थ दासगुप्ता याने काही किंमती वस्तू आणि  दागिने विकत घेतले असून ते राहते घरी होते. याबाबत चौकशीत दासगुप्ता यांनी सांगितल्यानंतर त्यांच्या घरातून 1 मनगटी घडयाळ आणि  सिल्वर रंगाच्या धातुचे 3 किलो 300 ग्रॅम वजनाचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत. न्यायालयापुढे सादर केलेल्या रिमांड अहवालातही पोलिसांनी ही नमूद केली आहे.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

New year 2021 mumbai police 2020 review crimes sushant singh rajput cbi corona

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com