
New Year 2023 : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे मेगाहाल!
मुंबई : रेल्वेचा दोन्ही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेतल्यामुळे नववर्षाचा पहिलाच दिवशी मुंबईकरांचे मेगाहाल झाले. विशेष म्हणचे रविवार वेळापत्रकामुळे निम्म्या लोकल फेर्या रद्द करण्यात येतात.
त्यामुळे देवदर्शनाला बाहेर पडलेल्या नागरिकांची लोकल आणि फलाटावर गर्दीचा सामना करावा लागला. तसेच ब्लॉक संपून देखील रात्री उशिराने मध्य रेल्वेवरील लोकल विलंबाने धावत होत्या. त्यामुळे मध्य रेल्वेचा कारभारावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहेत .
नववर्षाचा पहिला दिवस आणि रविवारची सुट्टी आल्याने नव्या वर्षाचा उत्साही आरंभ करण्याच्या हेतूने नागरिक कुटुंबकबिल्यासह मोठ्या संख्येने देवदर्शनासाठी आणि पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी घराबाहेर पडले.
मात्र, नववर्षाचा पहिलाच दिवशी मेगाब्लॉकचा सामना करावा लागला आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाऊन धीम्या मार्गावर घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे जलद मार्गावरील लोकल फेर्यावर परिणाम झाला. याकाळात लोकल फेर्या सुमारे 25 ते 30 मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवासी बेहाल झाले होते.
तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान ब्लॉकची कामे हाती घेण्यात आली होती. यामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल फेर्या रद्द करण्यात आल्या. यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांनी पर्यायी मार्गाने प्रवास करण्याला पसंती दिली.
मात्र ब्लॉक संपल्यानंतर ही मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल फेर्यामध्ये गर्दी असल्याने नवीन वर्षाचा पहिल्या दिवशी रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. विशेष म्हणजे दादर,कुर्ला, आणि ठाणे या रेल्वे स्थानकात मोठया प्रमाणात गर्दी उसळून आली होती.
प्रवाशांची कोंडीला कोण जबाबदार..?
रविवार आणि नवीन वर्ष असताना सुद्धा मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घेतला. तब्बल दोन वर्ष कोरोनामुळे नागरिकांना बाहेर पडता आले नाही. यंदा कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आल्याने यंदा बहुतांश नागरिक घराबाहेर पडले.
परंतु मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे प्रचंड हाल झाले आहेत. त्यातच रेल्वे स्थानकावर गर्दी असताना सुद्धा सीएसएमटी रेल्वे स्थानकात चित्रपटाचे चित्रीकरण ठेवून प्रवाशांची कोंडी करण्यात आली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचा कारभार रेल्वे मंत्र्याने लक्ष द्यावेत अशी मागणी अंकुश गुप्ता यांनी सकाळकडे केली आहे.