
पोलिसात दडलेला कर्तृत्ववान क्रीडापटू!
वदेवी पोलिस ठाण्यात सहायक आयुक्त असलेले नीळकंठ पाटील आपल्या कर्तव्याबरोबरच खेळाला प्राधान्य देत आले आहेत. गेली अनेक वर्षे त्यांनी खेळाचा प्रसार करत एक क्रीडापटू म्हणूनही अलौकिक कामगिरी केली आहे.
पोलिस विभागात आपल्या कर्तृत्वशाली कार्याचा ठसा उमटवून देशासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्यांमध्ये त्यांचा क्रमांक लागतो. एक-दोन नव्हे; तर हॉकी, क्रिकेट आणि बॅडमिंटन अशा तीन प्रकारच्या खेळांत पारंगत असलेल्या पाटील यांनी आतापर्यंत अनेक पारितोषिके पटकाविली आहेत.
नीळकंठ पाटील ठाण्यात राहतात. सध्या गावदेवी पोलिस ठाण्यात ते सहायक आयुक्तपदाची जबादारी सांभाळत आहेत. कामाच्या व्यापातही त्यांनी खेळाची आवड कायम जोपासली आहे. रोज पहाटे उठून दररोज एक तास ते बॅडमिंटनचा सराव करतात आणि तिथूनच पुढे सुरू होतो त्यांचा दिनक्रम. मग दिवसभर काम करायचे. घरी परतण्याची वेळ ठरलेली नाही. त्यातही सहा तास झोप मिळाली तरी पुरेशी होते, असे पाटील सांगतात.
बॅडमिंटन खेळाची आवड लहानपणापासून निर्माण झाली. वडिलांच्या मित्राच्या घरी लाकडी फ्रेममध्ये खेळाची रॅकेट लावलेली असायची. त्या वेळेस त्यांच्या घरी नेहमी सराव व्हायचा. नाशिकमधील बॉईज टाऊन पब्लिक स्कूलमध्ये मला खेळायला भरपूर वाव मिळाला. शाळेत बरेच काही शिकायला मिळाले, असे त्यांनी सांगितले.
माझे वडील दामोदर यांनी मला खेळण्यासाठी नेहमी प्रोत्साहन दिले. पत्नी ऊर्मिला हिचीही वेळोवेळी साथ मिळाली. मित्र दीपक रॉय यांनीही खेळात मला मार्गदर्शन केले. म्हणूनच मी आज खेळात प्रगती करू शकलो, असे नीळकंठ पाटील सांगतात.
राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण
शाळेत असताना नीळकंठ पाटील यांना हॉकी, बॅडमिंटन आणि क्रिकेट खेळायला मिळाले. त्यानंतर महाविद्यालयात अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन पदकांची कमाई केली. तिन्ही खेळांत कर्णधारपद भुषवून संघाला विजय मिळवून देण्यात त्यांना यश मिळाले. भोपाळमध्ये २०१२ मध्ये झालेल्या ऑल इंडिया पोलिस बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णचषक मिळवून देण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजाविली होती. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहायचे असेल, तर प्रत्येकाने एक तरी खेळ खेळलाच पाहिजे. खेळल्याने माणूस फिट राहतो, असा सल्ला ते आजच्या पिढीला देतात.