'असा' आहे मुंबईमध्ये उभारला जाणारा बाळासाहेब ठाकरेंचा 9 फुटी पूर्णाकृती पुतळा..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा जवळील महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेबांचा 9 फूट उंचीचा पुतळा उभारला जाणार आहे.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 9 फुटी पूर्णाकृती पुतळा येत्या 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीदिनी फोर्ट येथील रिगल सिनेमासमोरील चौकात उभारला जाणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जोगेश्वरी येथील मातोश्री येथे बाळासाहेबांच्या या पूर्णाकृती पुतळ्याची पाहणी केली. बाळासाहेब ठाकरे यांचा 9 फुटी पूर्णाकृती ब्राँझचा पुतळा असणार आहे, याचं काम जवळपास पूर्ण झालं असून आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुतळा पाहून समाधान व्यक्त केले. 

कलानगर येथील सुप्रसिद्ध वास्तूशिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारताना त्यांच्यासमोर अनेक आव्हान होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सभेला आल्यावर जनसमुदायला संबोधतानाचे भाव आणणं हे सर्वांत मोठं कठीण काम असल्याचं वडके सांगतात. बाळासाहेब हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यक्तीमत्व आहेत, त्यामुळे त्यांची हुबेहूब मूर्ती करणे हे एक आव्हान होत. एकप्रकारे शिवधनुष्यच पेलायच होतं अशी प्रतिक्रिया वास्तू शिल्पकार शशिकांत वडके यांनी दिली. मुख्यमंत्री उध्दव यांनी येऊन याची पाहणी केली आणि काही तांत्रिक गोष्टीच्या सूचना केल्याचे ही वडके यांनी सांगितले. 

दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा जवळील महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेबांचा 9 फूट उंचीचा पुतळा उभारला जाणार आहे. त्यासाठी 2 फूट उंच हिरवळ (लँडस्केप) सह 11 फूट उंच चबुतरा उभारला जाणार आहे. बाळासाहेबांची येत्या 23 जानेवारी 94 वी जयंती आहे. त्याच दिवशी बाळासाहेबांच्या पुतळ्याचे उदघाटन करण्याचे नियोजन केले जात आहे.

महत्त्वाची बातमी :  अखेर नीरव मोदी फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं 17 नोव्हेंबर 2012 रोजी निधन झालं. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी ऑक्टोबर 2015 ला गटनेत्यांच्या बैठकीत मांडला. त्याला तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी मंजुरी देऊन पालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला होता. पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर हा प्रस्ताव महाराष्ट्र्र पुरातत्व कमिटीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. पुरातत्व कमिटीने पुतळा उभारण्यास मंजुरी दिली आहे. मुंबई अर्बन आर्टस् कमिशन यांच्याकडून अद्याप पुतळा बसवण्यासाठी होकार आलेला नाही. पुतळा उभारताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने सदर प्रस्ताव राज्य सरकाराच्या गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. 

Webtitle : nine feet tall full statue of balasaheb thackeray is ready cm uddhav thackeray did review

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nine feet tall full statue of balasaheb thackeray is ready cm uddhav thackeray did review