
नऊ महिन्यांच्या बाळावर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया
मुंबई : जन्मजात पित्तनलिका नसलेल्या नऊ महिन्यांच्या बाळावर यकृत प्रत्यारोपणाचा पर्याय वापरून यशस्वी उपचार करण्यात यश आले आहे. मुंबईतील नानावटी मॅक्स रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करत बाळाला पुनर्जन्म दिला. वायू विसावदिया असे बाळाचे नाव असून नुकत्याच लग्न होऊन घरात आलेल्या त्याच्या काकीने आपल्या यकृताचा अंश दिल्याने डॉक्टरांना त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करता आली. जगातील अशा स्वरूपाची ती पाचवी यशस्वी शस्त्रक्रिया ठरली आहे.
वायू याला जन्मानंतर सफेद रंगाची विष्ठा व्हायची. तो जेव्हा सहा दिवसांचा होता, तेव्हा त्याला जन्मतःच बायलरी अॅट्रेसिया म्हणजे पित्तनलिका नसल्याचा क्वचित आढळणारा आजार असल्याचे निदान करण्यात आले. दोन आठवड्यांत त्याच्यावर आतडे यकृताला जोडण्याची (कसई पोर्टोएन्टेरोस्टोमी) शस्त्रक्रिया करण्यात आली; परंतु ती अयशस्वी झाल्यामुळे त्याला कावीळ, कोग्युलोपथी (रक्त न गोठण्यासह पातळ होणे), पोटात द्रव साचणे आणि वाढ न होणे अशासारखा यकृताचा गंभीर आजार झाला.
वायूवर यकृत प्रत्यारोपण करण्याचा एकमेव पर्याय डॉक्टरांसमोर होता. त्याच्या काकीने यकृताचा भाग दिल्याने त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. वायूने उपचारांना उत्तम प्रतिसाद दिला.
आई-वडील यकृतदानास अपात्र
वायूवर यकृत प्रत्यारोपण करण्याचा एकमेव पर्याय डॉक्टरांसमोर होता. वायूचे आई-वडील यकृतदान करण्यास अपात्र ठरल्याने त्याची काकी विधी विसावदिया यांनी पुढाकार घेतला. विधी महिनाभरापूर्वीच लग्न होऊन विसावदिया कुटुंबात आल्या होत्या. त्यांनी स्वेच्छेने आपल्या यकृताचा काही भाग दान केला.
नऊ महिन्यांच्या वयात एखादे बालक संवेदनशील झाल्याची अहवालात कोठेही नोंद नाही. पश्चिम भारतात प्रथमच डिसेन्सिटायझेशन प्रोटोकॉलचा वापर करण्यात आला.
- डॉ. विभोर बोरकर, डायरेक्टर, पेडिअॅट्रिक हेप्टोलॉजी, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी