
डोंबिवली : टक्केवारीत अडकली निर्बंधमुक्ती; पहिला डोस पूर्ण होणे आवश्यक
डोंबिवली : ठाणे जिल्हा कोरोना निर्बंधमुक्तीकडे (corona pandemic) वाटचाल करीत असताना कल्याण-डोंबिवलीची (kdmc) निर्बंधमुक्तीची वाट मात्र लसीकरणाच्या टक्केवारीत अडकली आहे. शासनाच्या निकषानुसार निर्बंधमुक्तीसाठी ९० टक्के नागरिकांनी पहिला डोस पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र पालिकेत ८१ टक्के नागरिकांनी पहिला डोस पूर्ण (corona vaccination) केला असल्याची कागदोपत्री नोंद पालिका हद्दीत झाली आहे. निर्बंधमुक्तीच्या (ease in covid curbs) निकषात कल्याण-डोंबिवलीचाही समावेश करावा, याविषयीचे निवेदन पालिका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला दिले आहे. मात्र, त्यावर अद्यापही काही उत्तर न आल्याने कल्याण-डोंबिवली अजूनही निर्बंधात जखडली आहे.
हेही वाचा: मोखाड्यात भीषण पाणी टंचाईच्या झळा; चारा, पाण्याच्या शोधात जणावरांचे स्थलांतर
पालिका हद्दीतील बहुसंख्य नागरिकांनी बाहेर लसीकरण करून घेतले असल्याने त्यांची नोंद लसीकरणाच्या आकडेवारीत करता आलेली नाही. नागरिकांचे लसीकरण झाले असल्याने कागदोपत्री ते दाखविणे देखील पालिकेला तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने आरोग्य विभागाची मोठी अडचण झाली आहे. लसीकरणाचे ९० टक्के लक्ष पूर्ण करणे अपेक्षित असताना कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ नगरपालिका यांनाही हा टप्पा गाठता न आल्याने येथील निर्बंध हटविले गेलेले नाहीत.
पालिका हद्दीतील रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट १० टक्केपेक्षा कमी व रुग्णव्याप्त ऑक्सिजन बेड्स ४० टक्के पेक्षा कमी, ७० टक्के नागरिकांचे दुसरा डोसचे लसीकरण होणे हे निकष पालिका पूर्ण करीत आहे. मात्र लसीकरणातील निकष पाहता ९० टक्के नागरिकांनी पहिला डोस घेणे आवश्यक असताना कल्याण-डोंबिवलीतील केवळ ८१ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. निर्बंधमुक्तीसाठी पालिका प्रशासनाकडून काय उपाययोजना करण्यात येत आहे याविषयी माहिती घेतली असता पालिका हद्दीतील ९० टक्केहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून काही तांत्रिक अडचणींमुळे कागदोपत्री तशी नोंद न झाल्याने पालिकेला याचा फटका बसला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा: "रिक्षा खरेदी करताना पार्कींग विचारली जाते, मग 'कार'साठी का नाही?"
लसीकरणाच्या पूर्ततेसाठी आरोग्य विभागाकडून पूर्ण प्रयत्न करण्यात आले असून बूस्टर डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ही ९२ टक्क्यांच्या वर गेलेली आहे. तसेच १२ ते १४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण नुकतेच सुरू करण्यात आले असून ३८७ जणांनी हा डोस घेतला आहे.
..म्हणून लसीकरणाची टक्केवारी कमी
- पहिल्या डोसच्या लसीकरणाची नोंद कल्याण-डोंबिवलीत ८१ टक्के दिसत आहे. कारण लशीचा तुटवडा होता, त्यामुळे अनेकांनी मुंबई व ग्रामीण भागात जाऊन पहिला डोस घेतलेला आहे. त्यामुळे त्यांची नोंद तेथे झालेली आहे.
- लोकसंख्येचा विचार केला तर प्रत्येक घरामागे चार नागरिक असे ग्राह्य धरले जाते. पालिका हद्दीतील बरीचशी घरे ही कायमची बंद आहेत. या सगळ्याचा फटका बसल्याने कागदोपत्री टक्केवारी कमी दिसते.
- अनेकांचे त्यांच्या कामाच्या ठिकाणी मुंबई, ठाणे इथे लसीकरण झाले. त्यांच्या लसीकरणाची नोंद त्या पालिकांकडे झाली.
सुरुवातीला डोस कमी असल्याने कल्याण-डोंबिवलीमधील दीड लाख जणांचे लसीकरण हे मुंबईत झाले आहे. त्यामुळे आपल्याकडील पहिल्या डोसची टक्केवारी ही कमी दिसत आहे. इतर निकषांची आपण पूर्तता केली असून कल्याण-डोंबिवलीचाही समावेश निकष पूर्तीमध्ये करावा, असे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांना देण्यात आले आहे.
- डॉ. अश्विनी पाटील, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कल्याण-डोंबिवली पालिका.
दृष्टिक्षेपात
लक्ष्य प्रगतीपर लसीकरण टक्केवारी
पहिला डोस १३,५९,७१५ ११,०२,८०४ ८१
दुसरा डोस ११,०२,८०४ १०,४७,६७० ९५
बूस्टर डोस २५,३७५ २३,८४५ ९४
एकूण डोस २४,८७,८९४ २१,७४,३१९ ८७
निर्बंध मुक्तीसाठी निकष
- पहिला डोस लसीकरण ९० टक्के (१८ वर्षांवरील लोकसंख्या)
- दुसरा डोस लसीकरण ७० टक्के (१८ वर्षांवरील लोकसंख्या)
- पॉझिटिव्हीटी रेट १० टक्के पेक्षा कमी
- रुग्णव्याप्त ऑक्सिजन बेड्स ४० टक्के पेक्षा कमी
Web Title: Ninety Percent People First Dose Vaccination Necessary For Ease In Covid Curbs For Dombivali
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..