नॅशनल पार्कमध्ये खासगी वाहनांना प्रवेश बंदी, सफारीसाठी असणार इलेक्ट्रीकल बस

नॅशनल पार्कमध्ये खासगी वाहनांना प्रवेश बंदी, सफारीसाठी असणार इलेक्ट्रीकल बस

मुंबईः लॉकडाऊनचे सहा महिने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी पर्वणीचे ठरले. प्रदूषण घटल्याने निसर्ग बहरू लागला तर प्राण्यांना ही मुक्त संचार करत मोकळा श्वास घेता आला. आता लवकरच उद्यान सर्वसांमान्यासाठी खुलं होणार असले तरी प्रदुषणमुक्तीच्या दिशेने पावले उचलण्याचा निर्णय उद्यान प्रशासनाने घेतला आहे.  त्यासाठी खासगी वाहनांना उद्यानात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

बोरिवलीचे 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' पर्यटकांसाठी खुले झाल्यानंतर उद्यानात खासगी वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा प्रशासनाने गांभिर्याने घेतला. यापुढे खासगी वाहनांची सोय उद्यानाबाहेर तयार केलेल्या वाहनतळामध्ये केली जाईल. एकावेळी  २५० हून अधिक वाहने उभी राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय गरजेनुसार त्याची क्षमता वाढवण्यावर भर देणार असल्याचे संचालक जी. मल्लिकार्जुन यांनी दिली. 

खासगी वाहनांसह बेस्ट बसेस देखील बंद करण्याचा विचार सुरू आहे. पर्यटकांच्या दळणवळणाकरिता उद्यानाअंतर्गत पर्यावरण पूरक 16 इल्केट्रिकल बस कार्यान्वित करणार असल्याची माहिती राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम) सुनील लिमये यांनी दिली. या बस 'नॅशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड'कडून उद्यान प्रशासनाला मिळणार आहेत. कॉर्पोरेशनकडून उभारण्यात येणारा 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प' राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर अभयारण्याला छेदून जात आहे. त्यासाठी पर्यावरणीय उपाययोजनाअंतर्गत या 16 बस देण्यात येणार आहेत. 

अतिक्रमणांवर उपग्रह छायाचित्रांची नजर

उद्यानातील दोन टक्के जागेवर वेगवेगळ्या प्रकारचे अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमण वाढू नये यासाठी उद्यान प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय़ घेतला आहे. उद्यानाच्या सीमेवर आणि अंतर्गत भागातील अतिक्रमणांच्या दैनंदिन मूल्यांकनासाठी उपग्रह छायाचित्रांची यापुढे मदत घेतली जाणार आहे. उपग्रह छायाचित्रणामुळे नव्या अतिक्रमणांचे मूल्यांकन करणे प्रशासनाला सोयीचे होणार आहे. पुढील तिन महिन्यात ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा उद्यान प्रशासनाचा मानस आहे. 
 
उद्यानाच्या संरक्षणासाठी प्रोटेक्शन कँप

उद्यानाच्या संरक्षणाकरिता प्रोटेक्शन कँप म्हणजेच चौक्या उभारण्यात येणार आहेत. यामुळे उद्यानाच्या गाभा विभागातील दैनंदीन घडामोडींवर लक्ष ठेवता येणार आहे. यासाठी स्थानिक लोकांची मदत घेतली जाणार आहे. उद्यान परिसरात साधारणता पाच ठिकाणी ह्या चौक्या उभारण्यात येणार आहे. यासाठी काही कर्मचा-यांची गरज भासणार असून स्थानिक लोकांना सामावून घेऊन त्यांना काम देण्यात येणार आहे.

वायरलेस संप्रेषण प्रणाली उभारणार

उद्यानातील अतिक्रमण ही देखील एक प्रमुख समस्या आहे. अतिक्रमण रोखण्याचा प्रयत्न करणा-या वनकर्मचाऱ्यांवर समाजकंटक सातत्याने हल्ले करतात. अशा संकटसमयी गस्तीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे माहिती देण्यासाठी किंवा आपल्या वरिष्ठांसोबत संवाद साधण्यासाठी कोणतेही साधन नसते. त्यासाठी उद्यानाच्या 104 चौ.किमी क्षेत्रामध्ये उपलब्ध असणारी 'वायरलेस संप्रेषण प्रणाली' उभारण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे वनकर्मचाऱ्यांना एकमेकांशी संवाद साधता येईल. पुढील तिन महिन्यात हे काम सुरू करण्यात येईल.

-------------------------

(संपादनः पूजा विचारे)

No access private vehicles in national park arrangement of electric bus

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com