मांडवी थांबलीच नाही; खेड स्थानकात संतप्त प्रवाशांचा उद्रेक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

मांडवी एक्स्प्रेस थांबलीच नाही... हॉलिडे एक्‍स्प्रेसचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांची तोडफोड 

रत्नागिरी ः जादा गाड्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एक्सप्रेस रविवारी चार ते पाच तास उशिराने धावत होत्या. कोकणात गणेशोत्सव साजरा करून मुंबईला परतणाऱ्या चाकरमान्यांना त्याचा फटका बसला. प्रचंड गर्दीमुळे मांडवी एक्‍स्प्रेस खेड स्थानकात न थांबल्याने प्रवासी संतापलेले होते. त्यातच मांडवीपाठोपाठ आलेल्या हॉलिडे एक्‍स्प्रेसचे दरवाजे उघडले न गेल्यामुळे संतप्त प्रवाशांचा उद्रेक झाला. प्रवाशांनी गाडीच्या काचा फोडत संताप व्यक्त केला. रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रवाशांना शांत केले. 

गणेश विसर्जनानंतर मुंबईकडे परतण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी खेड स्थानकात आले होते. दुपारी मडगावहून मुंबईला जाणारी मांडवी एक्‍स्प्रेस थांबा असूनही खेड स्थानकात न थांबताच पुढे रवाना झाली. गाडीचे आरक्षण असणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेस्थानकात गोंधळ घातला. कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या आधीच एक ते दीड तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांची खेड स्थानकात गर्दी झाली होती. मांडवी एक्‍स्प्रेसला 3 वाजून 56 मिनिटांनी खेड स्थानकात थांबा आहे. मात्र, आज ती खेड स्थानकात न थांबता पुढे गेली. परिणामी संतप्त प्रवाशांनी एकच गोंधळ घातला. अखेर अर्धा-पाऊण तासाने मागून हॉलिडे एक्‍स्प्रेस येत असल्याची उद्‌घोषणा झाली. त्यात अतिरिक्त डबे असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने सांगितले. प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला; मात्र हॉलिडे एक्‍स्प्रेस स्थानकावर आल्यावर दरवाजे न उघडल्याने प्रवाशांचा पुन्हा उद्रेक झाला. 

मागील गाड्यांनी प्रवासी रवाना
संतप्त प्रवाशांनी रुळावर दगड ठेवून गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे पोलिसांनी तो रोखला. रेल्वे पोलिसांनी प्रवाशांची समजूत काढत मागाहून आलेल्या कोचिवल्ली-गंगापूर आणि गणेशोत्सव स्पेशल गाड्यांमधून प्रवाशांना रवाना केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no halt to mandavi express at khed railway station... commuters get angry