सुरक्षा दलातील जवानांचे भविष्य वाऱ्यावर; मृत जवानाला ना वीमा कवच

मिलिंद तांबे
Thursday, 6 August 2020

महाराष्ट्र सुरक्षा दलातील 36 वर्षीय जवानाचे मंगळवारी कोरोनामुळे निधन झाले. 9 हजार जवानांच्या दलातील हा पहिला मृत्यू नोदवण्यात आला. मात्र, दुर्दैवाने तरतूदच नसल्याने मृत जवानाला ना वीमा कवच मिळणार आहे, ना नुकसान भरपाई. त्यामुळे दलातील 9 हजार जवानांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे समोर आले आहे. 

मुंबई  :   महाराष्ट्र सुरक्षा दलातील 36 वर्षीय जवानाचे मंगळवारी कोरोनामुळे निधन झाले. 9 हजार जवानांच्या दलातील हा पहिला मृत्यू नोदवण्यात आला. मात्र, दुर्दैवाने तरतूदच नसल्याने मृत जवानाला ना वीमा कवच मिळणार आहे, ना नुकसान भरपाई. त्यामुळे दलातील 9 हजार जवानांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे समोर आले आहे. 

26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर राम प्रधान समितीच्या शिफारशीनूसार महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळा अंतर्गत राज्य सुरक्षा दलाची स्थापना कऱण्यात आली. यात आतापर्यत 9 हजार जणांची भरती करण्यात आली आहे. राज्यातील 162 मह्त्वाच्या ठिकाणी राज्य सुरक्षा दलाकडून सेवा दिली जाते. त्याशिवाय राज्यभरातील महत्त्वाच्या रूग्णालयांतदेखील जवानांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती कऱण्यात आली आहे. सध्या रूग्णालयांत कोरोना रूग्णांवर मोठ्या प्रमाणावर उपचार सुरू आहेत. तरी देखील सरकारकडून या जवानांना वीमा कवच देण्यात आलेले नाही. तसेच, कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतरदेखील आर्थिक मदतीची कोणतीही तरदूद या जवानांसाठी करण्यात आली नाही. 

चाकरमाने निघाले कोकणाला मुंबई विभागातून 16 बस रवाना  तीन हजार प्रवाशांनी केले आरक्षण

महाराष्ट्र सुरक्षा दलातील 307 जवानांना आतापर्यत कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील 267 जवान कोरोनामुक्त झाले आहेत. तर, 39 जवानांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेला एक जवान हा मानखूर्दमध्ये आपली पत्नी व तिन मुलांसह वास्तव्यास होता. सुरक्षा दलातील नियंत्रण कक्षात तो कर्तव्यावर होता. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तब्येत खालावल्याने त्याला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, त्याला मलेरिया असल्याचे आढळले. त्यामुळे त्याला सायन रूग्णालयात हलवण्यात आले. सायन रूग्णालयात कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटीव्ह आली. आणि उपचार सुरू असतानाच 4 ऑगस्ट रोजी त्याच मृत्यू झाला.

 

सरकारकडून मदतीची अपेक्षा
राज्य सुरक्षा दलातील जवान आज मोठा धोका पत्करून आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. एकाचा मृत्यूही झाला. मात्र तरीही सरकारकडून कोणतीही मदत त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली नाही. तसेच, इतर रुग्णांनाही आवश्यक ती मदत मिळत नसल्याचे सुरक्षा दलातील एका कर्मचा-याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

मुलांचे संगोपन कसे करणार?
कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर पालिकेक़डून 3 हजार रूपये देण्यात आले. मात्र, ज्या प्रमाणे पोलिसांना सरकारकडून 50 लाख रूपये आणि पोलिस विभागाकडून 10 लाख रूपये त्यांच्या कुटुंबीयांना मिळतात, तसे आम्हाला दिले जात नाही. मृत जवानाला 3 मुले आहेत त्यांचे पुढे संगोपन कसे होणार, असा सवालही एका कर्मचाऱ्याने विचारला.

 

सुरक्षा दलाच्या जवानांना विमा सुरक्षा कवच तसेच आर्थिक मदत मिळण्याबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, त्याला अद्याप मंजूरी मिळाली नाही. जवानांना किमान 30 लाखांचे पॅकेज मिळावे, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
 - डी कनकरत्नम, पोलिस महासंचालक

-----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No insurance cover for dead soldiers OF MAHARASHTRA SECURITY FORCES