मुंबईतील पाच प्रमुख रस्त्यांवर "नो पार्किंग'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुरळीत, गतिमान आणि शिस्तबद्ध व्हावी, या उद्देशाने पालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.

मुंबई : मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुरळीत, गतिमान आणि शिस्तबद्ध व्हावी, या उद्देशाने पालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवर "नो पार्किंग' झोन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 30 ऑगस्टपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. ती सोडवण्यासाठी पालिका आयुक्त प्रवीणसिंग परदेशी यांनी विविध निर्णय घेतले आहेत. त्याचाच भाग म्हणून दक्षिण मुंबईतील महर्षी कर्वे मार्ग तसेच गोखले मार्ग, पूर्व उपनगरांतील लाल बहादूर शास्त्री मार्ग, पश्‍चिम उपनगरांतील स्वामी विवेकानंद मार्ग तसेच न्यू लिंक रोडच्या दोन्ही बाजूस चौदा किलोमीटर अंतरापर्यंत पार्किंग बंदी असेल. पालिका क्षेत्रातील बेस्ट बस थांब्यांच्या दोन्ही बाजूंस 100 मीटर अंतरावर पार्किंग करण्यास बंदी असेल. या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित विभागातील सहायक अधिकारी, अतिरिक्त आयुक्तांना दिले आहेत. 

पालिका क्षेत्रातील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी 7 जुलैपासून पालिकेच्या 26 सार्वजनिक वाहनतळांच्या 500 मीटर परिसरात पार्किंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अनधिकृत पार्किंगवर वाहतूक पोलिसांच्या मदतीने दंडात्मक कारवाईही सुरू करण्यात आली आहे. 

असे असेल "नो पार्किंग'? 
* महर्षी कर्वे मार्ग ः दक्षिण मुंबईतील चर्चगेट रेल्वेस्थानक ते ऑपेरा हाऊस दरम्यानचे सुमारे साडेतीन किलोमीटरच्या अंतर 

* गोखले मार्ग, दादर ः पोर्तुगीज चर्च ते एल. जे. जंक्‍शन मार्ग 

* लाल बहादूर शास्त्री मार्ग ः कल्पतरू ते निर्मल लाईफस्टाईल हा दीड किलोमीटरचा मार्ग 

* स्वामी विवेकानंद मार्ग ः जुहू विमानतळ ते ओशिवरा नदी दरम्यानचे सहा किलोमीटर अंतर 

* न्यू लिंक रोड ः डी. एन. नगर मेट्रो स्टेशन ते ओशिवरा नदीदरम्यानचे दोन किलोमीटर अंतर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No parking on five major roads in Mumbai