जागेअभावी वाहनांची ‘कोंडी’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

वसई ः वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी वसई-विरार महापालिकेने उड्डाणपुलाची नव्याने निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने कोंडी फोडण्यासाठी पुढाकार घेतला असला, तरी बेसुमार वाढत असणाऱ्या वाहनांसाठी शहरात वाहनतळ नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जागेअभावी वाहने कुठेही आणि कशीही उभी केली जात असल्याने कोंडीची समस्या गंभीर होत आहे. त्यामुळे शहरात वाहनतळ उभारून हा तिढा सोडवावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

वसई, नालासोपारा, विरार आणि नायगाव स्थानकापासून ते अगदी गर्दीच्या ठिकाणी मोजकेच वाहनतळ आहेत. जागा अपुरी असल्याने वाहने रस्त्याच्या कडेला तसेच कुठेही वाहने उभी केली जातात. यामुळे काही वेळेस नागरिकांना चालणेदेखील कठीण होतेच; मात्र अवजड वाहनांसह अन्य वाहनांना कसरत करावी लागते.

अरुंद रस्त्यांवरून कशीबशी वाट काढताना वाहनचालकांची दमछाक होते. नोकरदार आणि व्यावसायिक वाहने घेऊन स्थानक परिसरात येतात; मात्र वाहनतळाची कमतरता असल्याने जिथे जागा मिळेल, तिथे दुचाकी, चारचाकी वाहने उभी केली जातात. हे होत असतानाच काही रस्ते गॅरेजने व्यापले आहेत. 

महापालिकेने वाहतूक सुरळीत करण्यासाठी वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव या ठिकाणी नव्याने उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांकडूनही याचे स्वागत केले जात आहे. पालिका काही वेळा टोईंगच्या सहायाने बेकायदा उभी केलेल्या वाहनांवर कारवाई करते; परंतु या वेळी आम्हाला वाहनतळ तरी उपलब्ध करून द्या, अशी मागणी जोर धरत आहे. 

बेकायदा उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते; मात्र महापालिकेने वाहन, टोईंग व कर्मचारी उपलब्ध करून दिले, तर मोठ्या प्रमाणात कारवाई करता येईल. मुख्य रहदारीचे रस्ते मोकळे होतील आणि या वाहनांमुळे होणारी कोंडी थांबवता येईल.
विलास सुपे, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, वसई

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No traffic congestion in Vasai-Virar; Demand for a parking tower