मोखाडा - ऊन्हाची तिव्रता वाढु लागल्याने, पाणी टंचाईग्रस्त मोखाडा तालुक्यात टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या वाढु लागली आहे. अनेक गावपाड्यांत टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात येत आहे. जलजीवन मिशन च्या योजनांची कामे अपुर्णावस्थेत आहेत. विहीरींनी तळ गाठला आहे. त्यातच टॅंकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी करुन ही शासनाकडून टॅकर ऊपलब्ध करण्यात येत नसल्याने महिलांना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
प्रतिवर्षी पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्याला भिषण पाणी टंचाई भेडसावते. त्यावर टॅकरद्वारे पाणी पुरवठा ही ऊपाययोजना राबवली जाते. मात्र, टॅकर मुक्त गावपाडे करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार ने " जलजीवन मिशन " ही योजना आणली. मात्र, तालुक्यातील बहुतांश गावपाड्यांत ही योजना पोहोचलेलीच नाही. फेब्रुवारी महिण्यातच ऊन्हाची तिव्रता वाढली आहे. त्यामुळे विहीरींनी तळ गाठला आहे. बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. परीणामी टंचाईग्रस्त गावपाड्यांतील नागरीकांना पाणी टंचाई ने ग्रासले आहे.
सद्यस्थितीत, मोखाड्यातील गोळीचापाडा, धामोडी, चास- हट्टीपाडा, किनिस्ते - गवरचरीपाडा, ठाकुरपाडा, नाशेरा - हनुमान टेकडी, आसे - वारघडपाडा आणि मडक्याचीमेट या टंचाईग्रस्त 8 गावपाड्यांना 4 टॅकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
दरम्यान, तालुक्यातील सायदे ग्रामपंचायतीमधील हट्टीपाडा, जांभुळवाडी, गोमघर ग्रामपंचायतीच्या वाघवाडी आणि गोमघर तर पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरवाडी व हेदवाडी येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील ग्रामपंचायतीने 10 फेब्रुवारीला टॅंकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी केली आहे. मात्र, दहा दिवस ऊलटूनही प्रशासनाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हात पायपीट करावी लागते आहे.
सरकारी धोरण प्रशासनाने ठेवले धाब्यावर....
शासनाच्या धोरणानुसार टंचाईग्रस्त भागातील गावपाड्यांनी टॅंकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी केल्यानंतर, तेथील वास्तव स्थितीची तहसीलदार आणि गटविकास अधिकार्यानी पाहणी करणे अपेक्षित आहे. तसेच टंचाईग्रस्त गावपाड्यांला 24 तासात टॅंकरद्वारे पाणी ऊपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहे. प्रशासनाने तालुक्यात पाणी टंचाई असुन नळयोजनांची कामे अपुर्ण असतांना, टॅकर मुक्त तालुका दाखवण्याचा घाट घातला आहे. तर कोणत्याही अधिकार्यांनी या गावपाड्यांची पाहणी केलेली नसुन सरकारी धोरण धाब्यावर बसवले आहे.
आमच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील जलजीवन मिशन चे काम अपुर्णावस्थेत आहेत. अनेक गावपाड्यांत पाईपलाईन टाकलेली नाही. गोमघर आणि वाघवाडीच्या विहीरी आटल्या आहेत. टॅकरची मागणी करुन दहा दिवस ऊलटले तरी अजुन कोणत्याही अधिकार्यांने त्याची पाहणी केलेली नाही तसेच टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळे महिलांना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
- सुलोचना गारे, सरपंच, गोमघर ग्रामपंचायत.
तालुक्यातील अपुर्ण नळयोजना पुर्ण करुन टॅकर मुक्त तालुका करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी कामे अपुर्ण असल्याने तेथे टॅकरचे पाणी देणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी टॅकरची मागणी आली आहे तेथील पाहणी करुन, तातडीने टॅकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येईल.
- अक्षय पगार, गटविकास अधिकारी, मोखाडा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.