ठाण्यात कचरा विल्हेवाटीसाठी नोटीससत्र 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 डिसेंबर 2019

ठाणे पालिका हद्दीत एक वर्षापूर्वी मोठ्या गृहसंकुलांना "कचरा विल्हेवाट' प्रशासनाकडून बंधनकारक करण्यात आली होती. महापालिकेने या गृहसंकुलांतील कचरा उचलणे बंद केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पालिकेच्या या निर्णयावर लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी केल्यानंतर ही कारवाई थांबविण्यात आली होती. आता पुन्हा गृहसंकुलातील कचरा विल्हेवाट हा विषय ऐरणीवर आला असून, पालिकेने शहरातील तब्बल 425 गृहसंकुले आणि कंपन्यांना कचरा विल्हेवाटीच्या नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसीनंतरही कचरा विल्हेवाट न केल्यास कारवाई केली जाणार आहे. 

ठाणे : ठाणे पालिका हद्दीत एक वर्षापूर्वी मोठ्या गृहसंकुलांना "कचरा विल्हेवाट' प्रशासनाकडून बंधनकारक करण्यात आली होती. महापालिकेने या गृहसंकुलांतील कचरा उचलणे बंद केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पालिकेच्या या निर्णयावर लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी केल्यानंतर ही कारवाई थांबविण्यात आली होती. आता पुन्हा गृहसंकुलातील कचरा विल्हेवाट हा विषय ऐरणीवर आला असून, पालिकेने शहरातील तब्बल 425 गृहसंकुले आणि कंपन्यांना कचरा विल्हेवाटीच्या नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसीनंतरही कचरा विल्हेवाट न केल्यास कारवाई केली जाणार आहे. 

ठाणे शहरातील मोठी गृहसंकुले, रुग्णालये, मॉल आदी शंभर किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांना महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. यापूर्वी या गृहसंकुलांना वारंवार कचरा विल्हेवाटीची संधी देण्यात आली आहे. एक वर्षापूर्वी तर नोटीस बजाविल्यानंतरही कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्याने या गृहसंकुलांची कचराकोंडी करण्यात आली होती.

याप्रकरणात गृहसंकुलांना काही महिन्याचा अवधी देण्याची सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या गृहंसकुलांना कचरा विल्हेवाटीसाठी वाढीव मुदत दिली होती. मात्र त्यानंतरही बहुतांश गृहंसकुलांनी कचरा विल्हेवाट न केल्याने आता त्यांची कचरा कोंडी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत पन्नास गृहसंकुलांमध्ये कचरा विल्हेवाटीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मोठे गृहप्रकल्प राबवणाऱ्या विकासकांना आपले प्रकल्प सुरू करताना प्रदूषण विभागाचे "ना हरकत' प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.

कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्पाच्या आवारात कचरा विल्हेवाटीचा प्रकल्प लावणे आवश्‍यक असताना अनेकांनी ते केले नसल्याने आता याचा भुर्दंड सोसायट्यांना सहन करावा लागत आहेत. अशा सोसायटींनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केल्यास त्या विकासकावर कारवाई होऊ शकते, असा दावा महापालिकेतील अधिकाऱ्यानी केला आहे. यावरून पुन्हा कचरा विल्हेवाट हा विषय पुन्हा शहरात गाजणार आहे. 

कचरा व्यवस्थापनाची नियमावली 
केंद्र सरकारच्या केंद्रीय पर्यावरण, वन आणि जल, वायु परिवर्तन मंत्रालयाच्या वतीने आदेश काढण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील कचरा व्यवस्थापनाची नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार पाच हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या गृहसंकुलांना आणि शंभर किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांना कचरा विल्हेवाट स्वतः करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

आधी आस्थापने, नंतर गृहसंकुल 
पालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या सोसायटी कचऱ्याची विल्हेवाट लावणार नाही त्यांचा कचरा उचलणार नाही अशी भूमिका सुरुवातीला पालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली होती. तर सोसायट्यांना तीन वेळा मुदतवाढ देखील देण्यात आली होती. मात्र आता पहिल्यांदा वाणिज्य स्वरुपातील कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर रहिवाशी गृहसंकुलावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notices for garbage disposal in Thane