शनिवार-रविवारीही धावणार एसी लोकल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

शनिवार 14 सप्टेंबरपासून या सेवेची सुरुवात होणार आहे. 

मुंबई : पश्‍चिम रेल्वेच्या ताफ्यात दुसरी एसी लोकल दाखल झाल्यामुळे आता शनिवार-रविवार या दोन्ही दिवशी देखील एसी लोकलच्या फे-या चालविण्यात येणार आहेत. शनिवार 14 सप्टेंबरपासून या सेवेची सुरुवात होणार आहे. 

पश्‍चिम रेल्वेमार्गावर पहिली एसी लोकल 25 डिसेंबर 2017 रोजीपासून सुरू करण्यात आली. आधी प्रवाशांनी पाठ फिरविलेल्या एसी लोकलला आता मात्र प्रवाशांनी चांगलीच पसंती देण्यास सुरुवात केलेली आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार एसी लोकलच्या थांब्यामध्ये 1 नोव्हेंबर 2018 रोजीपासून वाढ देखील करण्यात आली.

त्यानुसार मरिन लाईन्स, चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड, दहिसर, मीरा रोड, नायगाव आणि नालासोपारा या स्थानकांत एसी लोकल थांबा घेते. एसी लोकलचे थांबे वाढविल्यामुळे प्रवासी संख्या देखील वाढली असून त्यामुळे महसुलात देखील वाढ झाली. 

आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये एसी लोकलने तब्बल 19 कोटी रुपयांचा महसुल पश्‍चिम रेल्वेला मिळवुन दिला. ऑगस्ट 19 पर्यंत 23 लाख प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास केला असून त्यातून 9 कोटी 61 लाखांचे उत्पन्न रेल्वेला मिळालेले आहे. प्रवाशांची एसी लोकलसाठी मागणी वाढते आहे. त्यानुसार आता शनिवार आणि रविवारी देखील एसी लोकल धावणार आहे.

येत्या शनिवारपासून नियमित वेळापत्रकाप्रमाणे एसी लोकल चालविण्यात येणार असल्याचे पश्‍चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविद्र भाकर यांनी सांगितले. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: now AC local will also run on Saturday-Sunday