esakal | मुंबईचा डबेवाला आता 'सेंट्रल किचन' सुरु करणार
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai-Dabbawala

मुंबईचा डबेवाला आता 'सेंट्रल किचन' करणार सुरु

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : कोरोनाच्या महामारीने डबेवाल्यांची आर्थिक गणिते चुकली आहेत. त्यामुळे आता कोरोनाच्या पडत्या काळाचा धडा घेत, डबेवाले आधुनिकतेकडे कूच करत आहेत. माहिती तंत्रज्ञान, ऑनलाइन जगाचे ज्ञान घेऊन 'आधुनिक डबेवाला' (mumbai dabbawala) बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर, आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी नवीन रोजगाराची निर्मिती करण्याच्या योजना आखण्यात आल्या आहेत. (now Mumbai dabbawala could start central kitchen)

मुंबईत नैसर्गिक आपत्ती, दहशतवादी हल्ले, अनेक संकटे आली तरी डबेवाले या संकटाना नेटाने सामोरे गेले. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे डबेवाल्यांच्या कार्यप्रणालीवर खूप मोठा परिणाम झाला. महामारीमुळे मागील एक वर्षांपासून डबेवाल्यांची सेवा कोलमडली. परिणामी, डबेवाल्यांची 130 वर्षांची परंपरा खंडित झाली. अचानक कोरोना विषाणूच्या महामारीने संपूर्ण जग थांबले. परिणामी, या काळात डबेवाल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक नुकसान सहन करावा लागलं. पोटाचा प्रश्न सुटण्यासाठी आणि कुटुंबियाचा आर्थिक गाडा चालविण्यासाठी डबेवाल्यांना पर्यायी उत्पन्नांसाठी सुरक्षा रक्षक, शेतीची कामे व अन्य इतर ठिकाणी कामे करावी लागत आहेत.

हेही वाचा: 'भातखळकर जरा शांत घ्या', मॅनहोल्सवरुन महापौरांची शाब्दिक चकमक

कोरोनाशी लढताना डबेवाल्यांनी अनेक गोष्टी शिकल्या. अनेक व्यवसाय बंद पडले होते. त्यामुळे डबेवाल्यांचा व्यवसाय कितपत चालू होईल याची श्वाश्वती नाही. त्यामुळे कमीत कमी एक ते दोन उत्पन्नाची साधने असणे आवश्यक असल्याचे डबेवाल्यांना गरजेचे वाटू लागले आहे. लॉकडाऊनमुळे डबेवाल्यांच्या व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे एक वेगळे आणि नवीन उत्पन्नाचे साधन म्हणून लवकरच सेंट्रल किचनची सुरवात करण्यात येणार आहे.

हेही वाचा: लस घेतल्यानंतर चुंबकत्व येतं का? तात्याराव लहाने म्हणतात...

या किचनच्या माध्यमातून रोजगार उत्पन्न करण्याकडे जास्त लक्ष देण्यात येणार असून ग्राहकांसाठी कमी किंमतीत योग्य व पूरक आहार (दुपारचे जेवण) वेळेवर संपूर्ण मुंबईमध्ये देण्याचा मानस आहे. या किचनच्या माध्यमातून सुरू होताच जवळपास 200 लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तसेच, भविष्यात हा व्यवसाय अनेक राज्यात व शहरात केला जाणार आहे. यासह अनेक हॉटेलसोबत करार करून त्यांच्या डिलिव्हरी डबेवाला करणार आहे. पडत्या काळात डबेवाल्यांनी आरोग्य विमा, स्वछता, विश्वास तसेच कामगारांच्या दृष्टीने भविष्यातील नियोजन, बचत या गोष्टी शिकल्या आहेत, असे मुंबई डबेवाला संघटनेकडून सांगण्यात आले.

पूर्वी एकूण 4 हजार 500 ते 5 हजार डबेवाले काम करत होते. दीड ते दोन लाख डबे रोज पोहोचवण्याचे काम करत होते. आता सध्या मुंबईमध्ये 200 ते 250 डबेवाले सुमारे 2 हजार ग्राहकांना सेवा देत आहेत. थोड्या दिवसात अजून 100 डबेवाले कामावर रुजू होतील.

"जगभरात आधुनिकता वाढत चाललेली आहे. त्याप्रकारे डबेवाल्यांना माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. आधुनिक पद्धतीने कामे जलद व सोप्या पद्धतीने करता येतात. याचे संपूर्ण ज्ञान डबेवाल्यांना कसे देता येईल व आधुनिक डबेवाला कसा तयार होईल याकडे लक्ष देण्यास सुरवात केली आहे. डबेवाल्यांचे काम करण्यासाठी तरूणांचा सहभाग कमी आहे. मात्र, आधुनिकता आल्यास आणि सेंट्रल किचनची सुरूवात झाल्यास तरूणांचा सहभाग नक्कीच वाढेल"

- उल्हास मुके, अध्यक्ष, मुंबई डबेवाला संघटना