व्यसनी लोकांनी आता सिगारेटच्या टपऱ्याही फोडल्या...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

लॉकडाऊन असल्यामुळे मद्य मिळत नाही म्हणून काही तळीरामांनी दारूची दुकाने फोडली होती. आता धूम्रपानप्रेमींनी टपऱ्या फोडण्यास सुरुवात केली आहे. दादर, अंधेरी येथील पानटपरी चालकांनी चोरीच्या तक्रारी नोंदवल्या आहेत.

मुंबई : लॉकडाऊन असल्यामुळे मद्य मिळत नाही म्हणून काही तळीरामांनी दारूची दुकाने फोडली होती. आता धूम्रपानप्रेमींनी टपऱ्या फोडण्यास सुरुवात केली आहे. दादर, अंधेरी येथील पानटपरी चालकांनी चोरीच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. 

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे मद्यप्रेमींप्रमाणे तंबाखू-गुटखा खाणारे आणि धूम्रपान करणाऱ्यांची पंचाईत झाली आहे. सिगारेटच्या एका पाकिटसाठी काळ्याबाजारात 100 ते 200 रुपये मोजावे लागत आहेत. तंबाखूच्या पुडीची किंमत 50 रुपयांवर गेली आहे. या पार्श्‍वभूमीवर अंधेरीतील घाटकोपर लिंक रोड येथील साटमवाडी भागातील सीताराम गुजर यांच्या टपरीतून सिगारेट चोरीला गेल्या. सोमवारी त्यांच्या आईला टपरीचा मागील बाजूचा पत्रा उचकटल्याचे दिसले. त्यानंतर गुजर यांनी दरवाजा उघडून पाहणी केली असता, सिगारेटची 450 पाकिटे आणि चॉकलेट असा 65 हजारांचा माल चोरट्यांनी लंपास केल्याचे समजले. त्यांच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रभादेवी परिसरातील नागो सयाजीची वाडी येथील सदानंद कोंडविलकर यांच्या पानाच्या टपरीतून सिगारेटचा साठा लंपास करण्यात आला. टपरीतील दिवा सुरू असून, दरवाजा उघडा असल्याची माहिती एका स्थानिकाने दादरमध्ये राहणाऱ्या कोंडविलकर यांना दूरध्वनीवरून दिली. त्यानंतर त्यांनी टपरीवर जाऊन पाहिले असता 1000 रुपये आणि 5000 रुपयांच्या सिगारेट गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांनी केलेल्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now the smoking lovers have hit the small shops