esakal | लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका अधिक; राहुल शेवाळेंचं पंतप्रधानांना पत्र

बोलून बातमी शोधा

Corona

लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका अधिक; राहुल शेवाळेंचं पंतप्रधानांना पत्र

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : देशभरात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे हे संकट दिवसेंदिवस तीव्र होत आहे. यामध्येच आता १० वर्षांखालील लहान मुलांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतांना दिसत आहे. त्यामुळेच या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे असं म्हणत खासदार राहुल शेवाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिलं आहे.

राहुल शेवाळे यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रामध्ये राज्यातील लहान मुलांमधील वाढलेल्या कोरोना संसर्गाची आकडेवारी दिली असून या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.

'लहान मुलांमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका वेळीच लक्षात घेऊन देशातील तज्ज्ञ डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. लहान मुलांसाठी योग्य ती औषधे, जम्बो कोविड सेंटर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मास्क यांची व्यवस्था करणेही गरजेचे आहे. तसेच लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लशींच्या निर्मितीसाठी देशभरात प्रयत्न करणाऱ्या कंपन्यांना सरकारने योग्य ते सहाय्य करावे, असं शेवाळे यांनी पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांच्या संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसते आहे. 'इंडियन अकॅडमी ऑफ पेडिऍट्रीक्स'नेही लहान मुलांमधील वाढत्या संसर्गाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात 1 मार्च ते 4 एप्रिल 2021 पर्यंत एकूण 60 हजार 684 लहान मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. यातील सुमारे 9 हजार 882 मुले 5 वर्षांखालील आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील एकूण कोरोना रुग्णसंख्येच्या 20 टक्के रुग्णसंख्या ही लहान मुलांची आहे.'

'केंद्रीय आरोग्य खात्याकडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, देशभरातील 5 राज्यांमध्ये एकूण 79 हजार 688 मुले कोरोनाबाधित झाली आहेत. छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये कोरोनाबाधित लहान मुलांचा आकडा हा अनुक्रमे 5 हजार 940, 7हजार 327, 3 हजार 004 आणि 2 हजार 733 इतका आहे. हरियाणा सरकारच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 11 मार्च ते 15 एप्रिल दरम्यान  11 हजार 344 कोरोनाबाधित लहान मुले आढळून आली. यावरून भविष्यातील मोठ्या संकटाची कल्पना येऊ शकते.'

संपादन : शर्वरी जोशी