प्लॅटफॉर्म शाळेची पटसंख्या वाढेचिना! 

प्लॅटफॉर्म शाळेची पटसंख्या वाढेचिना! 

ठाणे : उद्‌घाटनालाच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मुंब्रा रेल्वेस्थानक परिसरातील प्लॅटफॉर्म शाळेची पटसंख्या वाढत नसल्याने ठाणे महापालिकेच्या या प्रकल्पाविषयी शंका उपस्थित होत आहेत. नुकतीच या प्लॅटफॉर्म शाळेची वर्षपूर्ती झाली असून वर्षभरापूर्वी हजेरी पटावर असलेले विद्यार्थीच शाळेत उपस्थित आहेत. या संदर्भात, महापालिका प्रशासनाने, विद्यार्थी वाढावेत हा प्लॅटफॉर्म शाळेचा हेतू नसून रेल्वेस्थानकात भटकणाऱ्या गरीब कष्टकऱ्यांच्या मुलांची संख्या कमी झाल्याने पटसंख्या कमी झाल्याचे हे द्योतक असल्याचे स्पष्ट केले आहे. 

रेल्वेस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात भटकंती करणारी, भिक्षा मागणारी; तसेच बूटपॉलिश करणारी मुले ठाणे महापालिकेच्या निदर्शनास आल्याने या कष्टकरी, दुर्बल व वंचित घटकांतील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्लॅटफार्म शाळा सुरू करण्यात आली.

डिसेंबर 2018 ला मुंब्रा रेल्वेस्थानक परिसरात एका कंटेनरमध्ये शाळेचे उद्‌घाटन केले होते. मात्र, अनेक दिवस ही प्लॅटफॉर्म शाळा सुरूच झाली नव्हती. त्याविरोधात मनसेने आंदोलन छेडल्यावर अखेर "उम्मीद फाऊंडेशन' या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने काही दिवसात शाळा सुरू करण्यात आली. 

सुरुवातीपासून या शाळेत 6 ते 14 वयोगटातील 10 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील अनेक विद्यार्थ्यांचे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास इच्छुक नव्हते. या पालकांना आपल्या दैनंदिन व्यवसायात मुलांचा हातभार लावता येत होता.

अनेक जण भीक मागण्यासाठीही मुलांना सोबत ठेवत असतात. त्यामुळे शाळेची पटसंख्या वाढण्यात अडचणी उद्‌भवत असल्याचे शाळा संचालकांनी सांगितले. त्यामुळे शैक्षणिक वर्षाची वाट न बघता विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून शिक्षणासोबतच व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. 

शाळेत छोटी पिग्गी बॅंक 
शाळेत मुले यावीत यासाठी लहान सायकल आणि काही खेळणीदेखील ठेवण्यात आली आहेत. विविध प्रकारचे खेळ खेळण्यास मिळत असल्याने स्वतः विद्यार्थी शाळेत हजेरी लावू लागले. मात्र, पालकांसह या मुलांनाही दररोज पैसे हाताळण्याची सवय जडलेली असल्याने शाळेत आता छोटी पिग्गी बॅंक उपलब्ध करून देऊन बचतीची सवय लावली जात आहे. तसेच, नियमित शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना आता दररोज आंघोळीचे महत्त्वदेखील पटले असून यामुळे या मुलांच्या आरोग्याची हेळसांड दूर झाल्याचे दिसून येत आहे. 

मुंब्रा हा अतिशय दाटीवाटीने वसलेला विभाग असून मुंब्रा स्थानक परिसरात बहुतांश मुले भीक मागत फिरत असत. या कुटुंबातील मुलांना सिग्नल शाळेप्रमाणे शिक्षण देण्याच्या उद्देशाने प्लॅटफॉर्म शाळा सुरू करण्यात आली. यासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली जाते. तरीही शाळेत पटसंख्या घटली म्हणजेच हे या प्रकल्पाचे अपयश आहे, असे मानता येणार नाही. रेल्वेस्थानक परिसरात अथवा रस्त्यावर असणारी भटकी मुले कमी झाली असून यातील अनेक जणांना शिक्षणाची गोडी लागून त्यांनी नियमित शिक्षण घेण्यास सुरुवात केल्याचे हे द्योतक आहे. 
- मनीष जोशी 
उपायुक्त, शिक्षण विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com