
मुंबईत कोरोना रुग्णाकडून नर्सवर चाकू हल्ला
मुंबई: मुंबई शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. त्यात डॉक्टर, नर्स हे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. अशातच त्यांच्यावर चाकू हल्ला होणं ही लज्जास्पद घटना आहे. अशीच एक लज्जापद घटना शहरात घडली आहे. मलबार हिल येथील खासगी रुग्णालयातील नर्सवर कोरोना रुग्णाने चाकू हल्ला केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे.
नेमका घडलं काय?
लोअर परळ येथील रहिवासी असलेले राजेश शिवशंकर गुप्ता (45) यांना मलबारहिल येथील खासगी रुग्णालयात 12 एप्रिलला दाखल करण्यात आले होते. दाखल करत असताना त्यांना खोकला, ताप, श्वसनाचा त्रास, डोकेदुखी आणि पित्ताचा त्रास होता. त्यांचा कोविड अहवाल प्रतिक्षेत होता. पण सीटी स्कॅनच्या अहवालानंतर कोरोना सेक्शनमध्ये दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.
गुप्ता हे वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर योग्य उपचार देत नसल्याचे सांगून उद्धटपणे वागत होते. त्याला श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे आपल्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यासाठी त्यांनी तक्रारदार नर्स दिपीका वसावा यांच्यामागे तगादा लावला होता. तपासणीत त्यांची ऑक्सिजनची पातळी सामान्य असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्याची आवश्यकता नसल्याचे नर्सने त्यांना सांगितले. मात्र गोळ्या खाण्यावरूनही गुप्ताने नर्ससोबत वाद घातला. 16 एप्रिलला नर्स एका रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याची प्रक्रिया करत असताना आरोपी गुप्ताने ब्रेडला बटर लावण्यासाठी आणलेल्या चाकूने नर्सवर यांच्यावर हल्ला केला.
अचानक नर्सवर झालेल्या हल्ल्यात आरोपीनं नर्सच्या मानेवर आणि पाठीवर वार केले. यात नर्सच्या अंगावर असलेले पीपीई किट फाटून त्या जखमी झाल्या. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून रुग्ण उपचार घेत असल्यामुळे त्याच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
nurse is stabbed by corona patient mumbai malabar hill
(संपादन- पूजा विचारे)
Web Title: Nurse Is Stabbed By Corona Patient Mumbai Malabar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..