अधिकाऱ्यांनो, खड्डे बुजवा; अन्यथा घरी जा!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 September 2019

खड्ड्यांमुळे नागरिकांना व गणेशभक्तांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी रस्त्यावर एक जरी खड्डा दिसला, तरी थेट निलंबन करण्याचे नोटिशीद्वारे अधिकाऱ्यांना बजावले आहे.

नवी मुंबई : गणेश विसर्जनाआधी शहरात युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांना व गणेशभक्तांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी रस्त्यावर एक जरी खड्डा दिसला, तरी थेट निलंबन करण्याचे नोटिशीद्वारे अधिकाऱ्यांना बजावले आहे. त्यानुसार अभियांत्रिकी विभागातर्फे सुरू असलेले काम स्वतः शहर अभियंते सुरेंद्र पाटील प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करीत आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र खड्डे बुजवण्याचे चित्र नजरेस पडत आहे.

गेल्या १४ वर्षांत न झालेल्या पावसापेक्षा जास्त पावसाची नोंद नवी मुंबई शहरात झाल्यामुळे अगदी बेलापूर ते दिघापर्यंतच्या सर्व नोडमधील अंतर्गत रस्ते खड्डेमय झाले आहेत. ऐरोली नोडमधील अनेक ठिकाणच्या रस्त्यांवरील डांबराचा थरच निघून गेला आहे. आंबेडकर स्मारकापाठीमागील रस्ता खड्डेमय झाला आहे. दिघा, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे या सर्व विभागातील रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. वाशी, सानपाडा, नेरूळ व सीवूड्‌स हा फारसे खड्डे नसलेला शहरी भागदेखील खड्ड्यांपासून सुटलेला नाही. त्यामुळे मिसाळ यांनी दौरा करून सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पाच व सात दिवसांपूर्वीच्या गणरायाच्या विसर्जनाआधी महापालिकेने पडलेले खड्डे बुजवले होते. मात्र त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे  बुजवलेले खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. 

या खड्ड्यांमुळे गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना धडकी भरली आहे. या पार्श्वभूमीवर  विसर्जनाआधीच सर्व रस्ते खड्डेविरहित व गुळगुळीत करून जीपीएस टॅग फोटो पाठवण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. हे काम प्रामाणिकपणे सुरू आहे की नाही, याची सुरेंद्र पाटील स्वतः प्रत्यक्ष पाहून खातरजमा करीत आहेत. याखेरीज विसर्जनाच्या दिवशी खड्डे पडल्यास खड्डे बुजवण्यासाठी कामगारांची अधिकची फळी तैनात ठेवण्याच्या सूचना मिसाळ यांनी दिल्या आहेत. रस्ते खड्डेविरहित व्हावेत, बुजवलेले खड्डे अखेरपर्यंत कायम राहावेत, याकरिता प्रत्यक्ष कामांना भेट देऊन पाहणी सुरू आहे. अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी दिली.

शिस्तभंगाची कारवाई
शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे नेटाने बुजवण्यात यावेत याकरिता शहर अभियंते सुरेंद्र पाटील यांच्यामार्फत कार्यकारी अभियंत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पडलेले खड्डे तत्काळ बुजवलेले न दिसल्यास; तसेच बुजवलेले खड्डे पुन्हा उघडे पडलेले दिसल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशी लेखी समज देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या या कठोर आदेशामुळे सर्व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Officers, fill the pits; Otherwise go home!