
माथेरान : माथेरानमधील ऑलिंपिया मैदानाला राज्य सरकारने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पाच कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या मैदानाचा लवकरच कायापालट होणार आहे. याबाबत आदेश नगरविकास विभागातर्फे सर्व संबंधित सरकारी यंत्रणेला देण्यात आले आहेत. त्यामुळे हे काम लवकरात लवकर सुरू होऊन या मैदानाला नवीन झळाळी मिळणार आहे.
माथेरानमध्ये येणारा पर्यटक ऑलिंपिया मैदानाला आवर्जून भेट देतो. या मैदानाच्या गोल सर्कलमध्ये हॉर्स रायडिंग शिकवली जाते. मार्च 2017 मध्ये आदित्य ठाकरे यांनी या ऑलिंपिया मैदानाला फुटबॉल खेळाच्या निमिताने भेट दिली होती. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी मैदान सुसज्ज करण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी पुर्तता केली. यासाठी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, कर्जत तालुक्याचे आमदार महेंद्र थोरवे तसेच मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पाठपुरावा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 5 डिसेंबर रोजी ऑलिंपिया मैदान विकसित करण्यासाठी तत्वतः मंजुरी दिली होती. त्याचा पहिला टप्पा 5 कोटी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ऑलिंपिया मैदान विकसित करणार असल्याचा शब्द दिला होता. तो त्यांनी पूर्ण करून दाखवला. नगरपरिषदेने हे मैदान अद्ययावत करण्यासाठी ठराव ही पारित केला होता. त्याचा पाठपुरावा नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, आमदार महेंद्र थोरवे तसेच खासदार श्रीरंग बारणे यांनी सुरू ठेवला. त्याचे फलित माथेरानकरांना मिळाले.
- कुलदिप जाधव, स्थानिक.