दाऊदच्या भावाला अटक करणारे प्रदीप शर्मा वादग्रस्त का ठरले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

encounter specialist pradeep sharma

दाऊदच्या भावाला अटक करणारे प्रदीप शर्मा वादग्रस्त का ठरले?

मुंबई: मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जाणारे प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अँटिलिया स्फोटक प्रकरणात आज पहाटेच्या सुमारास NIA च्या पथकाने त्यांच्या अंधेरीतील निवासस्थानावर छापा मारला. छापेमारीची कारवाई होण्याआधी एप्रिल महिन्यात NIA ने काही तास प्रदीप शर्मांची चौकशी केली होती. (once Pradeep Sharma arrested dawood brother why Encounter specialist brush with controversies)

कोण आहेत प्रदीप शर्मा?

प्रदीप शर्मा २५ वर्ष मुंबईत पोलीस दलात कार्यरत होते. त्यांनी १०० पेक्षा जास्त गँगस्टरर्सचं एन्काऊंटर केल्याचं बोललं जातं. प्रदीप शर्मा २१ जानेवारी १९८३ रोजी पोलीस दलात दाखल झाले. माहिम पोलीस ठाण्यात त्यांची पहिली पोस्टिंग झाली होती. मुंबई अंडरवर्ल्डमधल्या धोकादायक गुंडांची माहिती काढून ती गुन्हे शाखेपर्यंत पोहोचवण्याचे कौशल्य शर्मा यांच्याकडे होते. त्यांनी अनेक बड्या गँगस्टर्सचं एन्काऊंटर केलं.

घसरणीचा काळ

अंडरवर्ल्डच्या संपर्कात असल्यामुळे त्यांची पोलीस खात्यातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर २००६ साली रामनारायण गुप्ता उर्फ लख्खन भय्या बनावट चकमक प्रकरणात त्यांचे नाव आले. प्रदीप शर्मा यांच्यावरुन अनेक बॉलिवूड चित्रपट बनवण्यात आले. ऑगस्ट २००८ मध्ये त्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले.

लख्खन भय्या बनावट चकमक प्रकरणात २०१० मध्ये त्यांना अटक करण्यात आली. पण जुलै २०१३ मध्ये मुंबई कोर्टाने त्यांची सर्व आरोपांमधून मुक्ततता केली. पण १३ अन्य पोलीस दोषी ठरले. याच प्रकरणाशी संबंधित असलेल्या विनायक शिंदे या पोलिसाला एनआएने अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटक केली आहे.

थेट दाऊदच्या भावाला केली होती अटक

प्रदीप शर्मा यांना दीर्घकाळासाठी निलंबित करण्यात आले होते तसंच महाराष्ट्रातील दूरवरच्या ठिकाणी त्यांची बदली करण्यात आली होती. पण आरोग्याचे कारण देऊन शर्मा यांनी तिथे जाण्यास नकार दिला. प्रदीप शर्मांनी त्यांच्या निलंबनाला आव्हान दिले. त्यानंतर त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले. प्रदीप शर्मा २०१७ मध्ये पुन्हा सेवेत रुजू झाले. ठाणे पोलिसंच्या खंडणी विरोधी पथकाचे त्यांना प्रमुख बनवण्यात आले. त्यावेळी प्रदीप शर्मा यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा लहान भाऊ इक्बाल कासकरला अटक केली होती.

राजकारणात प्रवेश

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर नालासोपाऱ्यातून निवडणूक लढवली. बहुजन विकास आघाडीचे क्षितिच ठाकूर यांच्याविरोधात निवडणूक लढवली. पण ४० हजारपेक्षा जास्त मतांनी शर्मा यांचा पराभव झाला. त्यानंतर राजकारणात ते फारसे सक्रीय दिसले नाहीत. निवडणूक लढवण्याआधी शर्मा यांनी पोलीस खात्यातून राजीनामा दिला.

टॅग्स :pradeep sharma