दीड हजार कोटींच्या सोन्याची तस्करी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 February 2020

दुबईतून चार हजार ५२२ किलोग्रॅम सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) आणखी एकाला अटक केली. या टोळक्‍याने वर्षभरात एक हजार ४७३ कोटी रुपये किमतीच्या सोन्याची तस्करी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यात झवेरी बाजारमधील काही व्यापाऱ्यांचाही समावेश आहे.

मुंबई - दुबईतून चार हजार ५२२ किलोग्रॅम सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) आणखी एकाला अटक केली. या टोळक्‍याने वर्षभरात एक हजार ४७३ कोटी रुपये किमतीच्या सोन्याची तस्करी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यात झवेरी बाजारमधील काही व्यापाऱ्यांचाही समावेश आहे.

अमजद सलीम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याचे गुजरातमधील काही व्यापाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध आहेत. मार्च महिन्यात तस्करांनी सोन्याचा साठा गुजरातवरून मुंबईत आणला असल्याची गुप्त माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार डीआरआयच्या पथकांनी डोंगरी, झवेरी बाजारात छापे टाकले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्या वेळी सात तस्करांना अटक केली होती. तस्करी करून आणलेले ३५ कोटी रुपयांचा सोन्याचा साठा आणि  दोन कोटींची रक्कम असा एकूण ३७ कोटींचा मुद्देमाल या वेळी जप्त करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी आणखी सात जणांना अटक केली असून, जानेवारी २०१७ पासून मार्च २०१९ पर्यंत या टोळक्‍याने चार हजार ५२२ किलो म्हणजेच एक हजार ४७३ कोटी रुपये किमतीचे सोने दुबईतून तस्करी करून भारतात आणल्याचे निष्पन्न झाले आहे.

तस्करांकडून समुद्रामार्गे हा सोन्याचा साठा गुजरातमध्ये आणला जात असे. तेथील मुद्रा बंदरावर पितळ असल्याचे सांगून आणलेला सोन्याचा कंटेनर बाहेर काढण्यात येई. त्यानंतर तो कंटेनर रस्त्याने मुंबईत आणला जायचा. त्या कारवाईत १७० किलो सोने हस्तगत करण्यात आले होते. याप्रकरणी आत्तापर्यंत १९ जणांना अटक करण्यात आली आहे.

२२९ कोटींची करचोरी
विदेशातून सोने तस्करी केल्यानंतर १५.५ टक्के आयात कर भरावा लागतो. त्याशिवाय जेवढे सोने आयात करण्यात येते, त्यातील ३० टक्के सोन्याच्या दागिन्यांची निर्यात करावी लागते. आरोपींनी अशा पद्धतीने १५.५ टक्के कर चुकवून सरकारची फसवणूक करीत सोन्याच्या तस्करीमागे २२९ कोटींचा कर चुकवला. निसार अलीयार हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याची माहिती डीआरआयच्या तपासात निष्पन्न झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One and a half crore crore gold smuggling