मिरा-भाईंदर महापालिकेतर्फे पूरग्रस्तांसाठी एक कोटी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

पालिकेतील अधिकारी १५ दिवसांचे व कर्मचारी ५ दिवसांचे वेतन देणार 

मुंबई : मिरा-भाईंदर महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी महापालिका फंडातून एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

कोल्हापूर, सांगली, सातारा व कोकण तसेच इतर भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्त भागाला पुन्हा उभे करण्यासाठी पूर्ण राज्यातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मिरा-भाईंदर महापालिकेतील अधिकारीवर्गाने १५ दिवसांचे व कर्मचाऱ्यांनी ५ दिवसांचे वेतन मिळून मुख्यमंत्री सहायता निधीला एक करोड रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे नुकताच दिला.

आयुक्त बालाजी खतगावकर यांनी एक महिन्याचा पगार दिला आहे. मिरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, आयुक्त बालाजी खतगावकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील या निधीचा धनादेश देताना उपस्थित होते.

भाजपच्या नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन
मिरा-भाईंदर महापालिकेतील भाजपच्या सर्व नगरसेवकांनी महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरस्थितीला मदत म्हणून एक महिन्याचे मानधन दिले. त्यानुसार सर्व नगरसेवकांचे मिळून एकूण ६ लाख १० हजार रुपये दिले आहे.

सेव्हन इलेव्हन कंपनीची ७ लाख ११ हजारांची पूरग्रस्तांना मदत
भाईंदर : मिरा-भाईंदरमधील सेव्हन इलेव्हन कंपनीने राज्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे ७ लाख ११ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक व कोकण भागातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे ७ लाख ११ हजार रुपयांचा धनादेश जमा केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One crore for flood victims by Mira Bhayandar Municipal Corporation