जेएनपीटीला शंभर कोटींचा फटका? विम्यामुळे भरपाई मिळणार; पाहणी अभ्यासनंतरही अधिकृत नुकसानीचा अंदाज नाही

सुजित गायकवाड
Thursday, 6 August 2020

वादळी वाऱ्याच्या तडाख्याने उरणमधील जेएनपीटी बंदराला सुमारे 100 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. जेएनपीटीने या तीनही क्रेनचा विमा उतरवला असल्याने ही भरपाई होणार आहे. मात्र, क्रेनअभावी दोन दिवस काम बंद राहिल्यामुळे अंदाजे 10 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते.

नवी मुंबई : वादळी वाऱ्याच्या तडाख्याने उरणमधील जेएनपीटी बंदराला सुमारे 100 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. जेएनपीटीने या तीनही क्रेनचा विमा उतरवला असल्याने ही भरपाई होणार आहे. मात्र, क्रेनअभावी दोन दिवस काम बंद राहिल्यामुळे अंदाजे 10 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते.

जेएनपीटी बंदरावर लागणाऱ्या जहाजांवरील कंटेनर उतरवण्यासाठी एकूण नऊ क्रेन बंदर प्रशासनाने बसवल्या आहेत. बुधवारी (ता. 5) दुपारनंतर सुटलेल्या वादळी वाऱ्याचा जेएनपीटी कंटेनर टर्मिनल्समधील क्रेनला जोरदार फटका बसला. वाऱ्याच्या वेगाने या बंदरावरील नऊ क्रेनपैकी 6, 7 आणि 8 क्रमांकाच्या क्रेन मोडून पडल्या. तर या क्रेनच्या शेजारी उभ्या असणाऱ्या दोन क्रेनला काही मार लागला. परंतु, त्या दोन्ही क्रेन काम करण्याच्या परिस्थितीत असल्याने सध्या जेएनपीटी प्रशासनाकडून क्रेनची पाहणी करून अभ्यास केला जात आहे. तोपर्यंत दुसऱ्या क्रेनच्या साह्याने एक जहाज रिकामे अथवा भरता येऊ शकत असल्याने निरीक्षण करून एक दिवसाने काम सुरू होईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, बुधवारी झालेल्या दुर्घटनेचा अभ्यास करणाऱ्या जेएनपीटी प्रशासनाला अद्याप झालेल्या नुकसानीचा अधिकृतरित्या अंदाज बांधता आलेला नाही.
कोसळलेल्या तीनही क्रेनचा विमा उतरवला असल्याने त्याची नुकसानभरपाईही जेएनपीटीला मिळणार आहे. मात्र, वादळी वाऱ्यामुळे कंटेनर हाताळणीचा थांबलेल्या कारभारामुळे उत्पन्नावर काहीसा परिणाम होईल, असा अंदाज अधिकाऱ्यांमार्फत वर्तवला जात आहे.

शिक्षकांच्या पेन्शन संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी, वर्षा गायकवाडांनी दिलं 'हे' आश्वासन

सुदैवाने जीवितहानी टळली
अपघात झालेल्या बंदरावर सुमारे दीड हजार कामगार आहेत; परंतु वाऱ्यामुळे कंटेनर हाताळणीचे काम थांबवण्यात आले होते. तसेच, देखभाल दुरुस्ती करणारे पथकही क्रेनजवळ गेले नव्हते. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. 

तीन नव्या क्रेनची खरेदी?
कोसळलेल्या तीनही क्रेन पूर्णपणे खराब झाल्यामुळे त्या दुरुस्त करण्यापलिकडे गेल्या आहेत. त्यामुळे जेएनपीटी प्रशासनाला आता तीन नवीन क्रेन खरेदी कराव्या लागणार आहेत. त्या दृष्टीने जेएनपीटी प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे समजते आहे. या तीनही क्रेन 2012 ला तब्बल 92 कोटी रुपये खर्च करून जेएनपीटीने बसवल्या होत्या. या क्रेनच्या साह्याने एका वेळेस लाखो कंटेनर असणारे दोन महाकाय जहाजे रिकामे करता येत होते. मात्र, आता तीनही क्रेन मोडल्याने एका वेळेस एक जहाजावरील कंटेनर रिकामे करता येणार आहे.

-------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One hundred crore blow to JNPT? Insurance will compensate; There is no official loss estimate even after the inspection study