
बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला असून, परिणामी दरात दहा रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, मार्च अखेरपर्यंत कांद्याचे दर हे असेच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
नवी मुंबई : कांद्याची आवक कमी झाल्यामुळे सोमवारी (ता.20) कांद्याच्या दराने उसळी घेतली. अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले, तर कांदा रोपांना पावसाचा फटका बसल्याने लागवड उशिरा झाली. त्यातच मध्यंतरी परदेशातून सुरू करण्यात आलेली कांद्याची आयात बंद करण्यात आली. त्यामुळे बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला असून, परिणामी दरात दहा रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, मार्च अखेरपर्यंत कांद्याचे दर हे असेच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
ही बातमी वाचली का? पोलिस पाटील हवे आहेत
अवकाळी पावसामुळे शेतात कांद्याची लागवड उशिरा झाली. त्यामुळे सद्यस्थितीत माल उपलब्ध नाही. त्यातच देशी कांद्याच्या तुलनेत परदेशी कांद्याला उठाव नसल्याने आयात बंद करण्यात आली होती. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा होत असल्याने कांद्याच्या दरात वाढ झाली आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. इजिप्तवरून येणाऱ्या कांद्याचे घाऊक दर शनिवारी (ता.18) 28 रुपये किलो होते. ते सोमवारी 38 रुपयांवर येऊन पोहचले आहेत. मध्यंतरी घाऊक बाजारात 35 रुपये किलो दरात विक्री होणाऱ्या कांद्याचे दर पुन्हा 52 रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत. परदेशी कांद्याचे सध्या दोन कंटेनर आवक बाजारात होत आहे. सोमवारी नाशिक, नगरवरून येणाऱ्या 106 गाड्यांची आवक बाजारात झाली असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.
ही बातमी वाचली का? नवी मुंबईत सुरू होणार मुख्यमंत्री कार्यालय
नवीन कांदा जोपर्यंत बाजारात उपलब्ध होत नाही, तोपर्यंत कांद्याचे दर चढेच राहतील. शेतात माल उपलब्ध नाही. त्यात परदेशी मालाला उठाव नाही. त्यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाली आहे.
- सुरेश शिंदे, कांदा-बटाटा व्यापारी.