बदलीसाठी शिक्षक आजारी!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

ऑनलाईन बदली प्रकरणात 153 शिक्षक रडारवर, बनावट माहिती सादर केल्याचे समोर 

ठाणे : घराजवळची शाळा मिळण्यासाठी धडपडणाऱ्या शिक्षकांना वचक बसविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली होती. पण ही बदली प्रक्रिया राबविताना काही शिक्षकांनी बनावट माहिती सादर केल्याचे समोर आले होते. आतापर्यंत बनावट माहिती सादर करणाऱ्या शिक्षकांची संख्या 68 असल्याचे मानले जात होते. मात्र याबाबतचा आढावा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतल्यानंतर ही संख्या तब्बल 153 शिक्षक बनावट माहितीमध्ये अडकल्याची बाब समोर आली आहे.

बनावट माहिती सादर करणाऱ्या 68 शिक्षकांवरील कारवाई अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र शिक्षण विभागाने अधिक चौकशी करून यामध्ये वैद्यकीय दाखले सादर करणाऱ्या शिक्षकांनाही समाविष्ट केल्याने एकूण शिक्षकांची संख्या आता 153 झाली आहे. प्रशासनाची अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या शिक्षकांना कोणत्याही स्थितीत सवलत न देण्याची भूमिका जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे यांनी घेतली आहे. तसेच या शिक्षकांवर कठोर कारवाईचे संकेत त्यांनी दिले आहेत.

ठाणे जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन बदलीमध्ये बनावटगिरी झाल्याचे आरोप होत होते. शिक्षकांच्या अनेक संघटनांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या.

त्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेत, अशा शिक्षकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी जवळच्या शाळांमध्ये बदली करून घेण्याच्या हेतूने 68 शिक्षकांनी चुकीची व खोटी माहिती ऑनलाईन दाखल केल्याची बाब जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे या शिक्षकांनी प्रशासनाची फसवणूक केल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी या विषयातील गांभीर्य लक्षात घेऊन प्राथमिक शिक्षण विभागाला या शिक्षकांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. या शिक्षकांचे केवळ निलंबन न करता त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास त्यांनी सांगितले आहे.

यापूर्वी या 68 शिक्षकांना नोटीस देऊन त्यांना पाच दिवसांत खोटी व चुकीची माहिती देऊन प्रशासनाची दिशाभूल केल्याच्या कारणाखाली खुलासा मागितल्यामुळे या शिक्षकांचे धाबे दणाणले होते. त्यांच्या खुलाशानंतरही संबंधित शिक्षकांवर कारवाई होणार असल्याचे संकेत जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत. 

वैद्यकीय दाखले बनावट 
पत्नी व पती यांच्या शाळेमधील 30 किमी. असल्यास जवळच्या शाळेचा लाभ घेणे सहज शक्‍य आहे, पण हे अंतर शिक्षकांनी त्यांच्या सोयीनुसार दाखवून सवलतीचा लाभ घेतला आहे. यामध्ये 49 शिक्षकांचा समावेश दिसून येत आहे. त्याचबरोबर वैद्यकीय दाखले दिलेल्या शिक्षकांचे दाखले ठाणे सिव्हील रुग्णालयासह टाटा, जेजे, सायन रुग्णालयांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. बनावट वैद्यकीय दाखले दाखल करणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the online transfer case, 153 teachers are on the radar, presenting fake information