कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत केवळ एका रुग्णाची भर

मिलिंद तांबे
Wednesday, 11 November 2020

एकेकाळी कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतून आता आनंदाची बातमी समोर आली आहे. धारावीत मंगळवारी केवळ एका रुग्णांची भर पडली आहे. 

मुंबई: कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. सर्वत्र कोरोनाचा प्रार्दुभाव पाहायला मिळतोय. अशातच मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं अथक प्रयत्न केले. त्यात आता याच प्रयत्नांचे सकारात्मक निकाल दिसून येत आहे. एकेकाळी कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतून आता आनंदाची बातमी समोर आली आहे. धारावीत मंगळवारी केवळ एका रुग्णांची भर पडली आहे. 

जी उत्तरमध्ये काल केवळ 5 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. धारावीमध्ये मंगळवारी दिवसभरात केवळ 1 नवीन रूग्ण सापडला असून एकूण रूग्णसंख्या 3,606 इतकी झाली आहे.  68 अॅक्टीव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दादरमध्ये ही काल केवळ 1 नवीन रुग्ण सापडला असून रुग्णांची एकूण संख्या ही 4,409 इतकी झाली आहे.  115 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीम मध्येही काल केवळ 3 नवीन रुग्णांची भर पडली असून रुग्णांची संख्या 4,162 इतकी झाली आहे.  283 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

अधिक वाचा-  तो शब्द पाळला गेला नाही म्हणून महाराष्ट्रात नवे राजकीय महाभारत घडलेः सामना

धारावी, दादर, माहिम परिसराचा समावेश असणाऱ्या जी उत्तर विभागात काल 5 नवीन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा 12,177 वर पोहोचला आहे. तर 456 अॅक्टीव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जी उत्तरमध्ये आतापर्यंत 616 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. धारावीमध्ये 3,237, दादरमध्ये 4,125 तर माहीममध्ये 3,737 असे एकूण 11,099 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

मुंबईत मंगळवारी 535 नवे रुग्ण , तर 19 मृत्यू

मंगळवारी मुंबईत 535 नवे रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,65,677 झाली आहे. तर काल 19 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 10,481 वर पोहोचला आहे. काल1057 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,38,086 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 90 टक्के इतका झाला आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 233 दिवसांवर गेला आहे. तर 9 नोव्हेंबर पर्यंत एकूण 16,36,080 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 3 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.30 इतका आहे.  मुंबईत काल नोंद झालेल्या 19 मृत्यूंपैकी 18 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 13 पुरुष तर 6 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 19 रुग्णांपैकी 13 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते तर 6 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते.

-------------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Only one patient in Dharavi the hotspot of Corona


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only one patient in Dharavi the hotspot of Corona