मुंबईत केवळ सौम्य आवाजाच्या फटाक्यांना परवानगी, पालिकेची नवी नियमावली जाहीर

समीर सुर्वे
Monday, 9 November 2020

कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक आणि खासगी परिसरात कोणत्याही प्रकारचे फटाके फोडण्यास बंदी करण्यात आली आहे. फक्त 14 नोव्हेंबरला लक्ष्मी पुजनला इमारतींच्या अथवा घरांच्या आवारात फुलबाजे आणि पाऊस (अनार)अशा स्वरुपाच्या फटाक्याची आताषबाजी करण्याची परवानगी महानगर पालिकेने दिली आहे.

मुंबई: कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक आणि खासगी परिसरात कोणत्याही प्रकारचे फटाके फोडण्यास बंदी करण्यात आली आहे. फक्त 14 नोव्हेंबरला लक्ष्मी पुजनला इमारतींच्या अथवा घरांच्या आवारात फुलबाजे आणि पाऊस (अनार)अशा स्वरुपाच्या फटाक्याची आताषबाजी करण्याची परवानगी महानगर पालिकेने दिली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ येऊ शकते.

या काळात घरा बाहेरुन आल्यावर हात, पाय, तोंड स्वच्छ करुनच घरात प्रवेश करावा. यासाठी साबण पाण्याचा वापर करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. 

दिवाळी साजरी करण्यासाठी महानगर पालिकेने आज नियमावली प्रसिद्ध केली आहे. कोविड बाधित रुग्णांमध्ये श्‍वसनाचे त्रास तसेच शरीरातील प्राणवायूची पातळी खालावण्याची शक्यता असते. त्यामुळे यंदा सार्वजनिक तसेच खासगी ठिकाणी फटाके फोडण्यावर महानगर पालिकेने बंदी आणली आहे. हॉटेल्स, क्लब, जिमखाना, संस्था, व्यावसायिक परिसर अशा ठिकाणीही फटाके फोडण्यावर बंदी करण्यात आली आहे.  फटाक्यांची आतषबाजी आणि त्यासंबंधीचे कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन करता येणार नाही. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर महापालिकेकडून तसेच फौजदारी कारवाई येईल असे महानगर पालिकेने स्पष्ट केले आहे. साथ रोग नियंत्रण कायदा 1897 ,आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि इतर काही कायद्यां अंतर्गत या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना तुरुंगाचीही हवा खावी लागणार आहे.

अधिक वाचाः  सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचा पंतप्रधान मोदींना चिमटा

ऑनलाईन ओवाळणी

दिवाळीच्या काळात प्रत्यक्षभेटी गाडी टाळून व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात. भाऊबीजेची ओवाळणीही शक्यतो ऑनलाईन करावी, असे आवाहनही महानगर पालिकेने केले आहे.  दिवाळीच्या खरेदीसाठी कमी गर्दीच्या ठिकाणी आणि कमी गर्दीच्या वेळी जावे. अपावादात्मक परिस्थितीत नातेवाईकांच्या घरी जाणे आवश्‍यक असल्यास घरात प्रवेश करण्यापूर्वी हात,पाय तोंड साबण लावून स्वच्छ धुवावा.  स्वत:च्या रुमालाने हात पाय तोंड पुसावे.तसेच घरात प्रवेश करण्यापूर्वी मास्क वापरावा. या काळात नातेवाईकांनी मोठ्या संख्येने जमणे टाळावे.
 
हे लक्षात ठेवा

  • सॅनिटायझर ज्वलनशील असल्याने दिवे लावताना, मर्यादित स्वरुपात फटाके फोडताना सॅनिटायझर लावलेले नसल्याची खात्री करावी.
  • सॅनिटायझर एवजी साबण आणि पाण्याने हात धुण्यास प्राधान्य दावे.
  • ठरवून दिलेल्या नियमानुसार फटाके फोडताना सोबत पाण्याने भरलेली बादली, साबण सुती रुमाल अथवा पंचा सोबत ठेवावा.

रांगोळी बरोबरच पाण्याची बादली आणि साबण

दिवाळीच्या काळात प्रत्यक्ष भेटीगाठी न करण्याचे आवाहन महानगर पालिकेने केले आहे. मात्र,अपावादत्मक परिस्थितीत घरी येणाऱ्या पाहूण्यासाठी अंगणातील रांगोळी, पणती बरोबरच पाण्याची बादली आणि साबणाची तयारी करुन ठेवावी.

--------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Only soft sound firecrackers allowed Mumbai new rules bmc announced


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only soft sound firecrackers allowed Mumbai new rules bmc announced