
मुंबईः गेल्या चार ते पाच महिन्यापासून कोरोनानं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रार्दुभाव पाहायला मिळाला. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा मुंबईत वाढताना दिसतोय. अनलॉक 4 नंतर मुंबईतील बाधित रूग्णांची संख्या वाढल्याचे दिसते. गेल्या महिन्याभरात रूग्णवाढीचा दर 0.41 टक्क्यांनी वाढला असून तो 0.83 वरून 1.24 वर गेला आहे. मृत्यूदरात ही वाढ झाली आहे. रूग्ण दुपटीचा कालावधी कमी झाला असून 83 दिवसांवरून 56 दिवसांवर खाली आला आहे. त्यामुळे मुंबईतील चिंता वाढली आहे.
पालिकेच्या एपीड सेलनं 13 ऑगस्टला जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईतील रूग्णांची एकूण संख्या ही 1,27,571 इतकी होती. त्यात गेल्या महिन्याभरात 42,122 रूग्णांची वाढ झाली असून महिन्याभरात रूग्णांचा आकडा 1,69,693 वर पोहोचला. अॅक्टीव्ह रूग्णांचा आकडा 15,801 इतका होता, त्यात ही 10,173 रूग्णांची भर पडली असून तो आता 25,974 इतका झाला आहे.
अनलॉक 4 नंतर मुंबईतील बाधित रूग्णांची संख्या वाढताना दिसते. महिन्याभरापूर्वी मुंबईतील रूग्णवाढीचा दर नियंत्रणात आणण्यात यश मिळाले होते. मात्र त्यात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत असून रूग्णवाढीचा दर 0.83 वरून 1.24 वर गेला आहे. गेल्या महिन्याभरात मुंबईत 4,907 मृत्यूंची भर पडली असली तरी मुंबईतील मृत्यूदर मात्र आज ही नियंत्रणात आहे.
महिन्याभरापूर्वी 1,713 वर असलेला मृत्यूंची आकडा 6,620 वर पोहोचला आहे.
कोरोना बाधितांसाठी सुरूवातीचा 10 दिवसांचा काळ हा महत्वाचा 'गोल्डन पिरियड' असल्याने रूग्णाचे लवकर निदान होणे गरजेचे असते. त्यात यश आले आहे. शिवाय नर्सिंग होम मधील अनेक गंभीर रूग्णांना मोठ्या रूग्णालयात हलवण्यात आल्याने गंभीर रूग्णाचे ही लवकर निदान होऊन उपचाराला वेळेत सुरूवात होत आहे. त्यामुळे मुंबईतील मृत्यूदर कमी झाला असल्याचे मृत्यूदर नियंत्रण समितीचे प्रमुख डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले.
मुंबईतील एकूण 24 विभागामध्ये कोरोना रूग्ण वाढताना दिसत आहेत. एकूण 24 विभागांपैकी 8 विभाग असे आहेत. ज्यात प्रत्येकी 8 हजाराच्यावर रूग्ण संख्या आहे. 9 विभाग असे आहेत ज्यांचा रूग्णवाढीचा दर हा 1.24 च्या वर आहे. दोन विभागात रूग्णवाढीचा दर हा 1.60 च्यावर गेला आहे. महिन्याभरापूर्वी 8 हजार रूग्णसंख्या असणारा एक ही विभाग नव्हता. महिन्याभरापूर्वी केवळ 3 विभागात 1 रूग्णवाढीचा दर हा 1.2 च्या वर होता.
मुंबईत दररोज सरासरी 700 ते 800 रूग्ण कोरोनामुक्त होतात. कोरोनातून बरे होणाऱ्या रूग्णांचा दर हा 79 टक्क्यांवर होता. त्यात घट होऊन 77 इतका झाला आहे. मुंबईत आता पर्यंत 1,32,349 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. अधिकाधिक कोरोना चाचण्यांवर भर देण्यात आल्याने रूग्णांचे लवकर निदान होत आहे. मात्र यामुळे काहीसा आकडा वाढल्याचे सांगण्यात येतेय.
याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना विचारले असता त्यांनी यासाठी अनलॉक 4 सह लोकांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचे सांगितले. अनलॉकनंतर अनेक गोष्टी आपण शिथिल केल्या. लोकं मोठ्या प्रमाणावर बाहेर पडू लागली. मात्र अनेक लोकं बाहेर फिरताना तोंडाला मास्क लावत नसल्याचे दिसते. त्यामुळे जनजगृतीसह मास्क न घालणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे काकाणी यांनी पुढे सांगितले.
पावसाळा सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात काही आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. अशातच मुंबईतील काही भागात मलेरिया पसरल्याचे दिसते. लोकांनी याकडे दुर्लक्ष न करता ताप, थंडी, खोकल्यासारखी लक्षणे जाणवत असल्यास कोरोना चाचणी करून घेणे महत्वाचे असल्याचे वन रूपी क्लिनिकचे प्रमुख डॉ राहूल घुले यांनी सांगितले.
मुंबईतील एन,एस,आर दक्षिण,जी उत्तर ,के पश्चिम,के पूर्व,पी उत्तर आणि आर मध्य विभागात प्रत्येकी 8 हजाराच्यावर रूग्ण असून आर मध्ये सर्वाधिक 10,223 इतकी रूग्णसंख्या आहे. सर्वाधिक कमी रूग्णसंख्या बी विभागात असून तिथे आतापर्यंत केवळ 1,430 रूग्णांची नोंद झाली आहे.
मुंबईत आतापर्यंत 8,178 रूग्णांचा मृत्यू झाला असून के पूर्व आणि जी उत्तर विभागात 500 च्यावर मृत्यू झाले आहेत. के पूर्व विभागात 523 तर जी उत्तर विभागात 524 सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ए विभागात सर्वाधिक कमी म्हणजे केवळ 78 मृत्यू झाले आहेत.
मुंबईतील रूग्ण दुपटीचा ससरासरी कालावधी हा 56 दिवस इतका आहे. आर मध्य, आर दक्षिण, आर उत्तर आणि डी विभागात रूग्ण दुपटीचा कालावधी हा सर्वात कमी म्हणजे 45 दिवस इतका आहे. एल विभागात हा कालावधी 84 दिवस इतका सर्वाधिक आहे.
-------------------------
(संपादनः पूजा विचारे)
Overall Corona situation Mumbai over past month read details
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.