कमळाच्या फुलांची प्रदूषणावर मात

तळोजा वासहतीतील तलावात कमळांचा बहर.
तळोजा वासहतीतील तलावात कमळांचा बहर.

नवीन पनवेल : सध्या नामशेष होत चाललेल्या या तलावाबरोबरीने मनमोहक रूप असलेला, सर्वांना आकर्षित करणाऱ्या कमळांनी तळोजातील प्रदूषणावर मात करीत तलावातील अस्तित्व टिकवून ठेवले आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील सीईटीपी प्लांटजवळ असलेल्या तलावामध्ये फुलून आलेली मनमोहक कमळाची फुले सध्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. नेहमी प्रदूषण व विविध समस्यांनी ग्रासलेल्या औद्योगिक वसाहतीलगतचे तळे कमळाच्या फुलांनी बहरल्याने पर्यावरणप्रेमींना समाधान व्यक्‍त केले आहे.

जनसंख्यावाढीच्या भस्मासुराने व सुसाट वेगाच्या शहरीकरणामुळे पनवेल तालुक्‍यातील तलावाच्या सौंदर्याला घरघर लागली. पूर्वी लाल व पांढऱ्या शुभ्र रंगांच्या कमळ पुष्पांनी बहरणाऱ्या तलावात आज हातावर मोजण्याइतकी कमळे फुलत आहेत; मात्र तळोजातील प्रदूषणावर मात करीत वसाहतीतील तलाव कमळांच्या फुलांनी बहरला आहे. सध्या मार्गशीर्ष महिना असल्याने घरोघरी लक्ष्मीपूजन करण्यात येते. त्यामुळे आदिवासी महिलांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे. 

कमळ वनस्पतींची विनाशाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्याची जागा जलपर्णी ही विषारी प्रदूषणीय वनस्पती घेऊ पाहत आहे. गावाकडे ज्या कमळाच्या नाजूक पानावरून अलगदपणे व ऐटीत चालणारा कोयत्याच्या आकाराची शेपटी असलेला देखणा कमळ पक्षी अलीकडे पाहायलाही मिळत नाही. वाढत्या प्रदूषणामुळे समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या या तलावाच्या ठिकाणी फुलून आलेली कमळे आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत; मात्र त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. 

तळोजा एमआयडीसीमध्ये केमिकल कंपन्यांमुळे जल प्रदूषण जास्त प्रमाणात आहे. कमळ हे दलदलयुक्त तळ्यामध्ये चिखलात उमलते. ज्या ठिकाणी हे तळे आहे त्या ठिकाणी एमआयडीसीचे प्रदूषित पाणी जात नाही. त्यामुळे या ठिकाणी कमळे मोठ्या प्रमाणावर बहरली आहेत. 
- श्रीपाद लेले, पर्यावरणप्रेमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com