ऑक्सिजनचा वापर दोन महिन्यांत दुपटीने वाढला, अन्न व औषध प्रशासनाची माहिती

मिलिंद तांबे
Thursday, 10 September 2020

राज्यातील कोविडच्या वाढत्या संख्येमुळे ऑक्सिजनचा वापर दोन महिन्यांत दुप्पटीने वाढला आहे.कोविड रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबईः  राज्यातील कोविडच्या वाढत्या संख्येमुळे ऑक्सिजनचा वापर दोन महिन्यांत दुप्पटीने वाढला आहे.कोविड रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या अन्न व औषध प्रशासन  तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा अखंडित पुरवठ्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

लॉकडाऊनपूर्वी  दिवसाला दररोज 200 ते 300 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज होती. कोरोना बाधित रूग्णांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी असलेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. अशा रूग्णांना बाहेरून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. 9 सप्टेंबर पर्यंत ऑक्सिजनचा वापर दुपटीने म्हणजेच 850 मेट्रिक टन झाला आहे. तोच  1 जुलै पर्यंत 450 मेट्रिक टन एवढा होता. 9 सप्टेंबरपर्यंत राज्यातील कोरोना रुग्णसंख्या 2.4 लाखांवर पोचली आहे. तीच 1 जुलै पर्यंत केवळ 79,075 होती.

अन्न व औषध प्रशासन तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या पथकांकडून सर्व कोविड आणि इतर रुग्णालयात अखंड ऑक्सिजनचा पुरवठा राहावा यासाठी प्रयत्न सूरू आहेत. ऑक्सिजन अभावी कोणत्याही रूग्णाला त्रास होऊ नये यासाठी रुग्णालयांतील ऑक्सिजनची माहिती घेतली जात आहे . ऑक्सिजन पुरवठा सुस्थितीत राखण्याची जबाबदारी नवनियुक्त परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडे देण्यात आली आहे.

राज्यात सक्रिय रूग्णांपैकी 35,540 ऍक्टिव्ह रुग्णांना सध्या ऑक्सिजनची गरज भासते. जुलै महिन्यात केवळ 11,861 जणांना ऑक्सिजनची गरज लागत होती. कोरोना  सुरू झाल्यापासून आम्ही शहरी व ग्रामीण भागात ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा केला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ऑक्सिजनची आवश्यकता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच अन्न व औषध प्रशासनाने ऑक्सिजन पुरवठ्यावरील निर्बंध  कडक केले आहेत. सध्या 24 मॅन्युफॅक्चरर्स  असून त्यांच्याकडून 950 ते 1050 मॅट्रिक टन उत्पादन घेतले जाते. तर 66 रिफिलर्स त्यांना मदत करत आहेत. कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याने  80 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय विभागासाठी पुरविणे बंधनकारक करण्यात आले आहे.  तर 20 टक्के ऑक्सिजन इंडस्ट्रीयल वापरासाठी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ऑक्सिजनचे प्रमाण सुरळीत ठेवण्यासाठी आम्ही टप्प्याटप्प्यात मॅन्युफॅक्चर्स कंपन्या वाढवत आहोत. सध्या रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज लक्षात घेत उत्पादकांसह पुरवठादारही वाढविले आहेत. जिल्हा आणि विभागीय स्थरावर माहितीसाठी रुग्णालयांशी आणि आरोग्य विभागाशी सतत संपर्क साधला जात आहे.
-अरुण उन्हाळे, आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन महाराष्ट्र

------------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Oxygen consumption doubled in two months according Food and Drug Administration


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oxygen consumption doubled in two months according Food and Drug Administration