दोन हात, एका पायाने चित्र काढणारा अवलिया

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 March 2020

एकाच वेळी दोन्ही हाताने आणि एका पायाने तीन वेगवेगळी स्केच चित्रकार राबीन बार साकारत होते. हा आगळावेगळा अनुभव मुंबईकरांनी सोमवारी (ता. २) जहांगीर कलादालनात घेतला.

मुंबई - समोर ठेवलेल्या तीन स्केचबोर्डवर एकाच वेळी दोन्ही हाताने आणि एका पायाने तीन वेगवेगळी स्केच चित्रकार राबीन बार साकारत होते. हा आगळावेगळा अनुभव मुंबईकरांनी सोमवारी (ता. २) जहांगीर कलादालनात घेतला. जागतिक कीर्तीचे चित्रकार राबीन बार यांचे ‘इन्कारनेशन’ हे चित्र प्रदर्शन जहांगीर कलादालनात भरवण्यात आले आहे. या वेळी त्यांनी उपस्थितांना हे प्रात्यक्षिक दाखवले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मूळचे आसामचे असलेले राबीन बार यांनी चित्रकलेचे कोणतेही शिक्षण घेतलेले नाही. लहान असताना अक्षर आणि अंकांच्या आकारात ते चित्रकला शोधत राहायचे. माझे मन कधीच अभ्यासात व खेळात रमले नाही. रमले ते केवल चित्रकलेमध्येच, असे राबीन बार म्हणाले. खेळण्याऐवजी हावडा येथे आमच्या गावाजवळील नदीकाठी मी वाळूमध्ये पायाने व हाताने चित्र रेखाटायचो. त्यातून एकाच वेळी पायाने आणि हाताने आपण चित्र काढू शकतो, याची प्रेरणा मिळाली, असे बार यांनी सांगितले.

ही बातमी वाचली का? ‘या’ वयोगटातील नागरिकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका

राबीन बार यांच्या कलागुणांवर आतापर्यंत ४५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. राबीन यांनी केवळ तीन मिनिटांत ३० रेखाचित्रे रेखाटण्याची किमया साधली आहे. या त्यांच्या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. प्रदर्शनात राबीन बार यांनी वेद आणि पौराणिक कथांवर साकारलेल्या विविध चित्रांचा समावेश आहे. ८ मार्चपर्यंत रसिकांना हा कलाविष्कार अनुभवता येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Painter Rabin Bar