डहाणू ,तलासरीत रात्रभर भूकंपाची मालिका, 3.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा डहाणूच्या समुद्रात केंद्र बिंदू

प्रविण चव्हाण
Friday, 11 September 2020

 पालघर जिल्ह्यातील डहाणू,तलासरी परिसरात भूकंपाची मालिका सुरूच असून गुरुवारी रात्री 11 वाजे पासून सकाळी 7 पर्यंत सौम्य आणि मध्यम स्वरूपाचे 12 ते 15 परिसरात हादरे बसले.

मुंबईः  पालघर जिल्ह्यातील डहाणू,तलासरी परिसरात भूकंपाची मालिका सुरूच असून गुरुवारी रात्री 11 वाजे पासून सकाळी 7 पर्यंत सौम्य आणि मध्यम स्वरूपाचे 12 ते 15 परिसरात हादरे बसले. रात्री 3.29 मिनिटाला 3.5 रिश्टर स्केल, 3.57 मिनिटाला पुन्हा 3.5 रिश्टर स्केल भूकंपाची क्षमता होती तर 2.8, 2.6, 2.6 , 2.2 रिश्टर स्केल स्वरूपाचे सौम्य स्वरूपाचे एकापाठोपाठ भूकंपाचा धक्क्याची नोंद राष्ट्रीय सिसमोलॉजस्टिक सेंटरच्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे. यातील 3.29 मिनिटाला बसलेल्या भूकंपाचा केंद्र बिंदू डहाणू जवळील समुद्रात 10 किमी खोल भूगर्भात झाल्याची नोंद झाल्याने नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

रात्रभर सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकांनी डहाणू, बोर्डी, झाई, बोरीगाव, घोलवड, जांबुगाव,  धुंदलवाडी, दापचरी सह तलासरी, वडवली, कवाडा, उधवा आणि इतर गावातील नागरिकांची झोपच उडवली. भूगर्भातून धरणीकंपाचा गूढ आवाज होऊन जमिनीला हादरे बसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास 3.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाने दापचरी परिसरातील एका घराच्या छताचे पत्र पडल्याने नुकसान झाल्याची माहिती हाती आली आहे. मध्यंतरी भूकंपाचे सत्र संथ झाले होते मात्र जुलै महिन्यापासून एकदोन दिवसाआड भूकंपाचे हादरे बसू लागले आहेत. यात ही होणाऱ्या भूकंपाची क्षमता लक्षात घेतली तर सर्वाधिक 3 रिश्टर स्केल ते 4.1 रिश्टर स्केल पर्यंत वाढलेली आढळून येत आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर 2018 पासून भूकंपाची मालिका सुरू आहे. भूकंपाची भूगर्भीय नोंदी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येऊन राष्ट्रीय सिसमोलॉजस्टिक सेंटर आणि भूकंपाचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांकडून अभ्यास करण्यात येत आहे. यापूर्वी अभ्यास करणाऱ्या तज्ञांकडून असे सांगण्यात येत होते की,  भूगर्भातील पाण्याच्या हालचालीमुळे यापरिसरात भूकंपाचे हादरे बसत आहेत आणि हळूहळू भूकंपाचे सत्र ही थांबेल अशी अपेक्षा केली जात होती. मात्र वाढती भूकंपाची मालिका दिवसेंदिवस नागरिकांसह जिल्हा प्रशासनासाठी चिंतेची बाब बनत चालली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून भूकंपाच्या पार्श्वभूमीवर डहाणू, तलासरी परिसरात मोकळ्या जागेत ठिकठिकाणी तंबू, मंडप बांधण्यात आले होते, मात्र नंतर तेही काढून घेण्यात आले आहेत. तसेच नागरिकांमधील भीती घालविण्यासाठी सुरू केलेली भूकंपसमयी सुरक्षेच्या  जनजागृती मोहीम संथ झाली आहे. यामुळे भूकंपाच्या पार्श्वभूमीवर  गुलाबी थंडीला सुरुवात होण्याआधीच प्रशासनाकडून नागरिकांसाठी मोकळ्या जागेत पुन्हा उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाढू लागली आहे.

3.29 मिनिटाला बसलेल्या भूकंपाचा केंद्र बिंदू डहाणू जवळील समुद्रात 10 किमी खोल भूगर्भात झाल्याची नोंद आहे. त्यामुळे वर्तमानकाळात समुद्रात भूकंपाची शक्यता लक्षात घेता त्सुनामीचा धोका उद्भवू शकतो का याचा ही अभ्यास होणे गरजेचे असून त्याअनुषंगाने उपाययोजना आखणे आवश्यक असणार आहे.

---------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Palghar 3.5 Richter scale earthquake sea Dahanu


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Palghar 3.5 Richter scale earthquake sea Dahanu