पनवेल नवी

पनवेल नवी
Published on

दोन दुकानांना भीषण आग ; लाखोंचे नुकसान
पनवेल ता.२० (बातमीदार) : शहरातील टपाल नाका एम जी रोड येथील २ दुकानांना आज सकाळी अचानकपणे लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा ऐवज जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
शहरातील एम जी रोड येथील हुसेनी ट्रेंड्स या दुकानाला आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास अचानक पणे आग लागली. याबाबतची माहिती दुकान मालकाला परिसरातील नागरिकांनी कळविली तसेच पनवेल महापालिकेच्या अग्निशमन दलाला व पनवेल शहर पोलीस ठाण्याला कळविण्यात आले. दरम्यान ही आग आतून पसरत बाजूला असलेल्या बुऱ्हानी ट्रेंड्स या दुकानाला सुद्धा आग लागली. अग्निशमन दलाच्या दोन बबांनी शर्तींचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या आगीत लाखो रुपयाच्या मालाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.


............
गाढी नदीला जलपर्णीचा विळखा

पनवेल, ता. १९ (बातमीदार) ः पनवेल तालुक्यातील विचुंबे गावालगत गाढी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. सुमारे चार ते पाच किलोमीटरपर्यंत जलपर्णीचा विळखा घट्ट बसल्याने हिरवा गालिचा पसरल्यासारखे दिसते.
गाढी नदीकिनारी पनवेल शहर वसले आहे. २००५ मध्ये आलेल्या पुरामुळे पनवेल शहराचा व सिडको वसाहतींचा काही भाग पाण्याखाली गेला होता. गाढी नदीचा उगम पनवेल तालुक्यातील पूर्वेकडील डोंगररांगांतून होतो. नदीचे पाणी पुढे खाडीत विसर्जित होत असल्याने भरती-ओहोटीचा परिणाम लगतच्या गावांवर होतो. सध्या गाढी नदी दूषित झाली असून मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा विळखा पडला आहे. दूषित रासायनिक पाणी, मलनिस्‍सारण वाहिन्यांचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जात असल्‍याने नदीपात्रात जलपर्णी फोफावली आहे. त्‍यामुळे जलचरांनाही धोका निर्माण झाला आहे. गुरे अन्य जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे.
पंचायत समितीच्य सभापती प्रणाली भोईर यांनी आपल्या फंडातून नदीपात्रातील जलपर्णी काढून साफसफाई केली होती. तसेच अनेक सामाजिक संस्था व निसर्गप्रेमी संस्थांना आवाहन करून पनवेलच्या नद्यांचे संवर्धन करण्याबाबतही विचार सुरू आहे. पनवेलमधील निसर्ग मित्रसंस्थेचे सुरेश रिजवूड हे गाढी नदीच्या स्वच्छता व साफसफाईसाठी पाठपुरावा करत आहेत.

गाढी नदीवर पाच ते सात किमी अंतरावर जलपर्णी पसरली आहे. या मुळे नदीतील जीवसृष्टी धोक्यात आली आहे. मासे व इतर जलचरांना जलपर्णीमुळे ऑक्सिजन मिळत नाही. सरकारने ठोस उपाययोजना करून गाढी नदीची स्‍वच्छता करावी.
- धनंजय पाटील, निसर्गमित्र पनवेल

....................


खंडित विजेमुळे नागरिक हैराण
नवी मुंबईत बत्ती गुल होण्याचे प्रमाण वाढले

तुर्भे, ता. १९ (बतामीदार) : उष्‍म्‍याबरोबरच विजेच्या लपंडावामुळे सध्या नवी मुंबईकर हैराण झाले आहेत. रात्री-बेरात्री बत्ती गुल होण्याचे प्रकार गावठाणात अधिक आहेत. सलग दोन महिन्यांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू असल्‍याने स्‍थानिकांसह लहान-मोठ्या व्यावसायिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, पावणे, तुर्भेसह अनेक ठिकाणी दररोज वीजपुरवठा खंडित होतो. एकदा बत्ती गुल झाली की चार ते पाच तासांनंतरच सुरळीत होते. कधी डीपी बॉक्सला आग तर कधी मुख्य वीजवाहिन्या नादुरुस्त होत असल्याने वीजपुरवठा खंडित होतो. रात्रीच्या वेळी वीज खंडित झाली की उकाड्यात जागरण होत असल्‍याचे नागरिकांचे म्‍हणणे आहे.
पावणे, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली या दोन्ही नोडमध्ये काही आठवड्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल व मेपासून विजेचा लपंडाव अधिकच वाढला आहे. एकीकडे असह्य करणारा उकाडा तर दुसरीकडे विद्युत उपकरणे बंद असल्‍याने कामांचा पुरता बट्ट्याबोळ होत आहे. तर टपाल कार्यालये, बँकेच्या आर्थिक व्यवहारातही बाधा येत आहे.
पावणे गावात तर दिवसातून किमान तीन ते चार वेळा दोन ते तीन तासांसाठी बत्ती गुल होते. शुक्रवारी देखभाल-दुरुस्‍तीच्या नावे सकाळी विद्युत पुरवठा खंडित होतो, तो थेट संध्याकाळी सहानंतर सुरू होतो. वीज पुरवठा खंडित झाल्‍याने डेअरीमधील दुग्धजन्य पदार्थ खराब होत असल्याने व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. परिणामी अनेकदा दुग्धजन्य पदार्थ फेकून द्यावे लागतात, अशी माहिती डेअरी चालकांकडून देण्यात आली. वेळी-अवेळी वीज खंडित होत असल्याने पाणीपुरवठ्‌यावरही परिणाम होतो. सध्या नागरिकांना होणार पाणीपुरवठा विजेवर चालणाऱ्या मोटारीवर आधारित असल्याने वीज नसली की पाणीपुरवठाही होत नाही. त्यामुळे नागरिकांना वीज पुरवठा खंडित झाली की अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सध्या संगणकावरच अनेक व्यवहार व व्यवसाय चालतात. मात्र वारंवार वीज गायब होत असल्‍याने नागरी कामांवरही परिणाम होतो. कोपरखैरणे, घणसोलीत सतत विजेचा खेळ सुरू असतो. गेल्‍या आठवड्यात घणसोली परिसरात तब्बल २० तासांनी वीज पुरवठा सुरळीत झाला होता. खंडित
विजेमुळे त्रस्‍त नागरिक महावितरणविरोधात आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आलेत.

सध्या उकाडा वाढला आहे, त्यात वारंवार बत्ती गुल होत असल्याने जीव कासावीस होतो. दिवसा वीज गेली तर किमान घराबाहेर बसता येते, मात्र रात्री बत्ती गुल होत असल्याने जागरणच होते. शिवाय चोऱ्याचे प्रमाणही वाढले आहे.
- मनीषा शिंदे, गृहिणी

विजेवर आधारित अनेक लहान-मोठ्या व्यवसायावर चांगलाच परिणाम होत आहे. एकदा वीजपुरवठा खंडित झाला की चार पाच तासांनीच पूर्ववत होते. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थ खराब होतात. सध्या महिलांची आगोटीच्या कामाची लगबग आहे. विजेचा खेळ सुरू असल्याने मसल्याच्या चक्कीही बंद होते.
- सुनील काळे, नागरिक

शहरात वीज खंडित होण्याबाबत काही तक्रारी आल्या नाहीत, तरीही ज्‍या विभागात समस्‍या जाणवत आहे, तेथील संबंधित कार्यालयाला विजवाहिन्यांची तपासणीबाबत सांगितले जाईल.
- ममता पांडे, महावितरण, जनसंपर्क अधिकारी, भांडुप


......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com