वेबसाइटवरील जाहिरातीवरून मोबाईल चोरणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

नवीन पनवेल - ओएलएक्‍स या ऑनलाइन खरेदी- विक्री करणाऱ्या वेबसाइटवर मोबाईल विक्रीसाठी दिलेल्या जाहिरातीला प्रतिसाद देताना नाव बदलून मोबाईल विकत घेण्याचा बहाणा करून तो चोरून नेणाऱ्या एकास करंजाडे परिसरातून अटक करण्यात आली आहे.

विशाल हरीश शर्मा (33) असे या आरोपीचे नाव असून त्याने यापूर्वी अशा प्रकारे चार मोबाईल व काही डेबिट कार्ड चोरलेले आहेत.

पुणे शिवाजीनगर भागात राहणाऱ्या महिलेने आपला सॅमसंग नोट 4 कंपनीचा मोबाईल विक्रीसाठी ओएलएक्‍स या वेबसाईटवर जाहिरात दिली होती. विशाल याने मोबाईल खरेदी करण्याची तयारी दाखविली; परंतु त्याने नाव आदित्य मल्होत्रा असे सांगितले व सदर महिलेस पुणे येथील जंगली महाराज रोडवरील मॉडर्न कॅफेमध्ये बोलावून घेतले. बोलत असताना त्यांच्याकडून 70 हजार रुपयांचा मोबाईल काढून घेऊन आपल्या मोबाईलला रेंज नसल्याचा बहाणा करून व महत्त्वाचा फोन करावयाचा आहे असे सांगून तेथून त्याने पळ काढला. त्या फोनच्या कव्हरमध्ये सदर महिलेचे ड्रायव्हिंग लायसेन्स, बॅंकेचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड होते. या महिलेने पुणे येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्याचा समांतर तपास सायबर क्राइम सेलकडून करण्यात येत होता. दरम्यान, संशयित आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले.

तसेच, चोरलेल्या मोबाईलची तांत्रिक माहिती घेऊन सदर पोलिसांच्या पथकाने त्याला करंजाडे परिसरातून ताब्यात घेतले आहे. या वेळी त्याचे खरे नाव उघडकीस आले. तसेच, त्याच्याकडील चार मोबाईल फोन व एका बॅंकेचे डेबिट कार्डसुद्धा हस्तगत करण्यात आले. अशा प्रकारे अजून काही जणांची फसवणूक झाली असल्यास त्यांनी संबंधित पोलिस ठाणे अथवा सायबर क्राइम सेलशी संपर्क साधावा, असे आवाहन पनवेल पोलिसांकडून करण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: panvel news crime